नवी मुंबई / प्रतिनिधी
श्रीगणेशाच्या आगमनानंतर गौरींचेही अतिशय उत्साहात आगमन झाले आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३ विसर्जनस्थळांवर एकुण १२४८६ श्रीगणेशमुर्तींचे ९२२ गौरींसह सुव्यवस्थित रितीने विसर्जन पार पडले. महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १चे उपआयुक्त सुभाष इंगळे व परिमंडळ २ चे उप आयुक्त सुरेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग अधिकारी यांचेमार्फत सुयोग्य व्यवस्था ठेवण्यात आली होती. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गौरींसह श्रीगणेशमुर्ती विसर्जन होणार्या सातव्या दिवशी बेलापूर विभागात ५ विसर्जन स्थळांवर १७९० घरगुती, ५१ सार्वजनिक व १८६ गौरी, नेरूळ विभागात २ विसर्जन स्थळांवर २२३७ घरगुती, ८० सार्वजनिक व ११० गौरी, वाशी विभागात ३ विसर्जन स्थळांवर १५३३ घरगुती, ४३ सार्वजनिक व ९६ गौरी, तुर्भे विभागात २ विसर्जन स्थळांवर ६६१ घरगुती, ४१ सार्वजनिक व ५४ गौरी, कोपरखैरणे विभागात ३ विसर्जन स्थळांवर १९७९ घरगुती, ८६ सार्वजनिक व २२७ गौरी, घणसोली विभागात ४ विसर्जन स्थळांवर १९७४ घरगुती, ३३ सार्वजनिक व ८४ गौरी, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळांवर १०९९ घरगुती, ४६ सार्वजनिक व ११३ गौरी, दिघा विभागात १ विसर्जन स्थळांवर ८०७ घरगुती, २६ सार्वजनिक व ५२ गौरी अशाप्रमाणे एकुण २३ विसर्जन स्थळांवर १२०८० घरगुती व ४०६ सार्वजनिक अशा एकुण १२४८६ श्रीगणेशमुर्तींचे व ९२२ गौरींचे विसर्जन संपन्न झाले.
गौरीगणपतीचा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मागील दीड दिवस व पाच दिवसाचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाल्यानंतर गौरींसह विसर्जीत होणार्या श्रीगणेशमुर्तींची संख्या जास्त असते हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने योग्य ती व्यवस्था आधीपासूनच केली होती. त्यामुळे विभाग अधिकारी यांच्यासह विभागातील अधिनस्त अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफगार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले होते. श्रीमुर्ती विसर्जनकरीता तराफ्यांची तसेच आवश्यक त्या ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती व प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युतव्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती व पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. १४ मुख्य तलावांमध्ये मागील तीन वर्षांपासून करण्यात आलेल्या इटालियन गॅबियन वॉल निर्धारीत क्षेत्रात भाविक भक्तांनी व मंडळांनी गौरी व श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून महापालिकेच्या आवाहनास पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने अनमोल सहकार्य दिले.
संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांना आवश्यक सूचना देणे शक्य झाले व गर्दीचे नियोजन करणे तसेच विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यात मोलाची मदत झाली. यानंतरही अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणावर होणारे सार्वजनिक मंडळांचे श्रीगणेशमुर्ती विसर्जन लक्षात घेऊन तशाप्रकारची व्यवस्था करण्याची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असून प्रतिवर्षीप्रमाणेच याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात उंच व्यासपिठ उभारुन विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणार्या श्रीगणेशमुर्तींवर महापौर सागर नाईक व इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका यांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यास नागरिकांनीही सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.