दिपक देशमुख
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या ३५व्या वाढदिवसानिमित्त शनिवार, ३० ऑगस्ट रोजी अवयवदान संकल्प या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशी, सेक्टर ९ ए मधील प्लॉट १-सी, येथील दैवज्ञ ज्ञाती हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या व सामान्य जनतेच्या उपस्थितीत ‘अवयव दान’ अर्ज भरून घेवून अवयवदान मोहीमेस प्रोत्साहन देण्याकरीता एका जनजागृती सभा, अर्ज नोंदणीचा कार्यक्रम असे वाढदिवसानिमित्त आगळ्या वेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाकरीता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभागिय आरोग्य प्रत्यारोपण /प्रतिरोपण समन्वय समिती, सायन रूग्णालय यांचेबरोबर समन्वय करण्यात आला असून मान्यताप्राप्त रूग्णालयाचे तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि अवयव दान मोहीमेचे प्रशिक्षित कार्यकर्ते, स्थानिक मान्यवर नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला अवयव दानाचे महत्व, वैशिष्ठ्ये आणि उपयुक्तता याबाबत उपस्थितांना एका जनजागरण मोहीमेंअर्ंतगत दृकश्राव्य मोहीमेअर्ंतगत काही चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत.
माणूस मेल्यावरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयव दान आहे. एक सुदृढ माणूस मेला तर तो जाता जाता १० माणसांना जीवनदान देवून जातो, हे जगातील एक आश्चर्य आहे. त्यामुळे मरावे परि किर्तीरूपी उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार अवयवदानाची चळवळ प्रेरणा देवून जाते. आपला वाढदिवस हा संकल्पदिवस व्हावा आणि खर्या अर्थांने अनेकांना नवा जन्म देणारा जन्मदिवस व्हावा या विचाराने भारावलेल्या चळवळ्या प्रवृत्तीच्या ध्येयवेड्या गजानन काळेंनी ३० ऑगस्ट रोजी वाशी अवयवदानाचा संकल्प करणार्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अवयव दानाच्या मोहीमेस वाढदिवसाचे निमित्त असले तरी उच्च, उदात्त आणि सामाजिक, आरोग्य हित तसेच समाजरक्षणाकरीता केला जाणारा हा नि:स्वार्थी, जनहितैषी, प्रामाणिक प्रयास असल्याने या कार्यक्रमात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे.