नवी मुंबई : हाय-फाय नवी मुंबई आता वाय-फाय सिटी बनली असून आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी कोपरखैरणे आणि वाशी या दोन रेल्वे स्थानकांच्या परिसरात मोफत वाय-फाय सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री ना.नाईक यांच्या शुभहस्ते या आधुनिक सेवेचे उद्घाटन करण्यात आले. आगामी कालावधीत या मोफत सेवेच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईला जगाशी जोडून ठेवण्याचा मानस पालकमंत्री ना.नाईक यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
वाय-फाय सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे पक्षप्रतोद विनीत पालकर, नगरसेवक संपत शेवाळे, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक राजू शिंदे, नगरसेविका शिल्पा मोरे, समाजसेवक प्रकाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना.नाईक आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, आ.संदीप नाईक यांनी नवी मुंबईकर नागरिकांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुरु करण्याची मागणी माझ्याकडे केली होती. त्यानुसार त्यांची ही जनहिताय मागणी पूर्ण करत आजपासून ही सेवा नवी मुंबई शहरात सुरु झाली आहे. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राबरोबर आधुनिकतेची कास असणार्या या शहराला वाय-फाय सेवेमुळे अधिक फायदा होणार आहे. नवी मुंबईकरांबरोबरच नवी मुंबईत कामासाठी बाहेरुन येणार्यांनाही या सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. आज मोफत वाय-फाय सेवेच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा आहे. नजिकच्या कालावधीत नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या परिसरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरु करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण नवी मुंबईत ही वाय-फाय सेवा सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्री महोदयांनी सांगितले.
सायबरनेटीक आणि डब्ल्यू नेट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कंपन्या संयुक्तपणे कोपरखैरणे आणि वाशी रेल्वे स्थानक परिसरात वाय-फाय सेवा पुरविणार असल्याची माहिती आ. संदीप नाईक यांनी याप्रसंगी दिली. वाय-फायची सुविधा देत असताना या सेवेचा कोणी गैरवापर करू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करुन ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आपला ई- मेल आयडी, मोबाईल क्रमांक, नाव अशी सर्व माहिती नोंदवावी लागणार आहे. माहिती नोंदविल्यानंतर एसएमएसद्वारे त्यांना पासवर्ड देण्यात येईल. या पासवर्डचा वापर करुन वाय-फाय कनेक्ट करता येणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
नवी मुंबईकरांसाठी वाय-फाय सेवा सुरु झाल्याने त्याचा फायदा सर्वांना होणार असल्याचे सांगत आगामी कालावधीत रिलायन्सच्या फोर जी सेवेचा लाभ देखील नवी मुंबईकरांना देण्याचा मनोदय राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.