आश्चर्य ! शौचालय चोरीला
नागपूर : शाळांमधील स्वच्छतागृहांच्या कमतरतेबाबत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंता व्यक्त करीत असतानाच, भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या शाळांमधून शौचालय चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कागदावर पूर्ण झालेली स्वच्छतागृहे प्रत्यक्षात दिसतच नाही, ते चोरी गेले की काय, असा सवाल नगरसेवकांनी मंगळवारी नागपूर मनपाच्या आमसभेत उपस्थित केला तेव्हा अवघे सभागृह अवाक् झाले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांना देण्यात आलेल्या कोट्यवधीच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप नेहमीच केला जातो. कॉंग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी मंगळवारी तो उघडकीस आणला. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळेच्या वर्गखोल्या व इतर बांधकामासाठी निधी मिळतो. २००४-०५ पासून या अभियान अंतर्गत मनपाला निधी मिळाला. प्रत्यक्षात २०११मध्ये मनपाने यासाठी नियामवली तयार केली. त्यानुसार मोठया बांधकामासाठी झोन कार्यालयामार्फत निविदा काढून काम करण्याचे निश्चित करण्यात आले. मनपाच्या हिंदी मोर उच्च प्राथमिक शाळेच्या पाच वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात तीनच खोल्या बांधल्या. एका शाळेत शौचालय बांधायचे होते. पाचपैकी तीन शौचालय बांधले. दोन शौचालये कुठे गेले, कुणालाही कळले नाही. बांधलेल्या शौचालयाचे स्लॅब कधीही कोसळू शकतील, अशी स्थिती आहे.
निधी मिळाला असताना बांधकाम होत नाही. कागदावर बांधकाम झाल्याचे दाखवून चक्क वर्गखोल्या व शौचालयही चोरीला जात आहे. शाळेच्या शौचालयाच्या नावावरही पैसा लाटण्यात येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या. मनपाच्या १७ शाळांमधील बांधकाम अपूर्ण असताना पूर्ण पैसे उचलण्यात आले. मंजूर निधीपेक्षा २३ लाख रूपये अतिरिक्त खर्च करण्यात आले. तर २१ शाळांवर ६५ लाखाच्या जवळ अतिरिक्त निधी खर्च करण्यात आला. हे कामही अपूर्ण आहे. पैसे संपल्याचे कारण सांगून मनपाच्या इतर हेडमधून निधी उचलला गेल्याचा आरोपही पांडे यांनी केला.
या प्रकाराची माहिती झाल्याने उपायुक्तांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचे निर्देश दिले. मात्र,अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही. शिक्षणाधिकारी यावर सभागृहाचे समाधान करू शकले नाहीत. तर, उपायुक्तांनी सारवसावर करण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी प्रश्नाचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी आयुक्तांना चौकशी करून माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले.