दिपक देशमुख
नवी मुंबई : घरातील वायरींमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून घराचे नुकसान होण्याची घटना नेरूळ सेक्टर ६ परिसरात सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नसली तरी घरातील वस्तूंचे काही प्रमाणात नुकसान होवून वायरी पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात प्लॉट १९० वरील गौरी सदन इमारतीमधील प्लॅट १०१ मध्ये रमेश धुमाळ यांच्या सदनिकेत हा प्रकार घडला. या आगीचे वृत्त कळताच नेरूळ पोलीस, एमएसईडीसीचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाची एक गाडीही त्वरीत आल्याने आग आटोक्यात आली. आग किरकोळ असली तरी बघ्याची गर्दी रात्रीच्या वेळीही बर्यापैकी होती. आगीचे वृत्त कळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर, भाजपा ६९चे वॉर्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल, सामाजिक कार्यकर्ते सुजित शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.