सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे सांस्कृतिक व धार्मिक विचारांचे, आगरी कोळी संस्कृतीचे शहर आहे. या शहरात आपण शांततेने व आनंदाने राहतो पण काही गुंडगिरी करणारे समाजकंटक नागरिकांना धमक्या देऊन घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला जर दहशतवाद, गुंडगिरी नको असेल तर फक्त राष्ट्रवादीलाच मतदान करा, असे आवाहन ऐरोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी केले. महापे हनुमाननगर येथून संदीप नाईक यांनी आपल्या प्रचार फेरीस सुरुवात केली. याप्रसंगी ते बोलत होते.
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार संदीप नाईक यांनी महापे हनुमाननगर या ठिकाणाहून मंगळवारी (ता.७) सायंकाळी ४.३० ला आपल्या प्रचाराची सुरुवात केली. ही प्रचार फेरी महापे गाव, कोपरी गाव, महात्मा गांधी कॉम्प्लेक्स, जुहूगाव अशी काढण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत पाटील, नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी महापौर अंजनी भोईर, समाजसेवक सुनील सुतार, नगरसेविका शिल्पा मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक चौकात लाडके उमेदवार संदीप नाईक यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांच्या गजरात व महिलांनी केलेल्या औक्षणाच्या स्वरुपात स्वागत होत होते. प्रत्येक वॉर्डमध्ये प्रचार फेरीमध्ये माणसागणिक वाढ होताना दिसत होती. जमलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून संदीप नाईक यांचाही प्रचार रथातून न चालता कार्यकर्त्यांसोबत चालण्याचा उत्साह वाढतच होता. शिवाय ऐनवेळी आलेल्या पावसातही नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला नाही. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर संदीप नाईक यांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष व युवा वर्ग यांच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकही जोशाने सहभागी झाले होते.
युवा उमेदवार संदीप नाईक यांनी यावेळी सर्व प्रभागात पायी फिरून विकासालाच मत द्या, असे आवाहन संदीप नाईक यांनी मतदारांना केले. यावेळी ही प्रचारफेरी महापे हनुमाननगर ते महापे गाव, कोपरी गाव, जुहूगाव, महात्मा गांधी कॉम्प्लेक्स
ते जुहूगाव अशी काढण्यात आली व या प्रचार फेरीची सांगता जुहूगावमधील श्रीकृष्ण सोसायटी याठिकाणी झाली. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी आपल्या प्रचाराच्या चौक सभेप्रसंगी उमेदवार संदीप नाईक मतदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधकांकडे आमच्यावर आरोप करण्यासारखे काहीही नसल्यामुळे ते आता घराणेशाहीचा ठपका ठेवत आहेत. परंतु मी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि लोकनेते गणेश नाईक यांनी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.
पुढे बोलताना संदीप नाईक म्हणाले की, याठिकाणी सिडकोनिर्मित असणार्या घरांना संरक्षित करून त्यांना अधिक एफएसआय मिळवून देऊन त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न हा निश्चितपणे मार्गी लावू, गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरेही नियमित करण्यासाठी सतत विधानसभेत पाठपुरावा केला आहे. परंतु या निर्णयाला उशीर करण्यास कॉंग्रेस पक्षाच्या काही धूर्त लोकांनी आपल्याला कसे क्रेडीट घेता येईल, याचा प्रयत्न केला. आपापल्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. परंतु नवी मुंबईची जनता ही सुज्ञान असून कोण काय करते? याची माहिती त्यांना आहे. नागरिकांना अनेक प्रलोभने, आश्वासने दिली जातील, ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणून खोटी प्रलोभने देतील परंतु आम्ही जी आश्वासने देतो ती पाळतो, असे सडेतोडउत्तरही संदीप नाईक यांनी विरोधकांना दिले.