शरद पवारांनी साधला मोदीवर निशाणा
सुजित शिंदे
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका यापूर्वीही झाल्या आहेत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेंयी आदींनी पंतप्रधान असताना प्रचारात सहभाग घेतला. पण मोजक्याच शहरात सभा घ्यायचे. आताचे पंतप्रधान भरपूर सभा घेत आहेत. त्याबद्दल आमची तक्रार नाही. पण देशाची जबाबदारी सांभाळण्यासाठी जनतेने त्यांना पंतप्रधानपद सोपविले आहे. कोणा राज्याचे आमदार निवडून आणण्यासाठी नाही सोपविले.पाकीस्तानने गेल्या १५ दिवसात १७ वेळा हल्ला केला. देशाला स्वतंत्र संरक्षण मंत्री नाही. सैन्य सीमेवर मारले जात आहे आणि देशाचा पंतप्रधान मात्र आपल्या पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे देशाला दुर्दैवाने पहावयास मिळत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नवी मुंबईतील प्रचार सभेत केली.
बेलापुर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश नाईक आणि ऐरोली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १४च्या मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उपस्थित जनसमुदायाला भाषण करताना पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे आणि कारभाराचे वाभाडे काढले.
देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी सोडून देशाच्या पंतप्रधानाला भाजपाचे आमदार निवडून आणणे महत्वाचे वाटत असल्याचे सांगून शरद पवार पुढे म्हणाले की, पाकच्या हल्ल्याचा समाचार घेण्यास भारताचे लष्कर सक्षम आहे. संरक्षण खाते मंत्रीपदाची जबाबदारी मी सांभाळलेली आहे. सेनेच्या सामर्थ्यांची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांना फक्त संदेश देण्याची आवश्यकता असते.पण संदेश देण्यासाठी देशाचा पंतप्रधान राजधानीत पाहिजे ना. देशाचा पंतप्रधान कोठे तर आपल्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रचारात गुंतलाय ही मोठी चिंताजनक बाब असल्याचे सांगत पवारांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपाच्या जाहीरातीवर घणाघाती हल्ला चढविण्याची संधी यावेळी पवारांनी साधली. महाराष्ट्रात माफियांचे राज्य ही जाहीरात भाजपाकडून केली जात आहे. प्रचारात शिवछत्रपतींचा आशिर्वाद असे सांगितले जाते आणि दुसरीकडे महाराष्ट्राला माफियांचे राज्य संबोधून राज्याची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण कोण देत आहे. आमच्याकडे असले की गुन्हेगार आणि यांच्याकडे गेले की पवित्र उमेदवार ही भाजपाची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आली आहे. बबनराव पाचपुते, किसन कथोरे, गावित यांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजपानेच गोंधळ घातला. विधानसभेचे कामकाज रोखून धरले. या भ्रष्टाचार्यांना व३०२चे कलम असणार्या गुन्हेगारांना तिकीट राष्ट्रवादीत मिळणार नाही याची कुणकुण लागताच त्यांनी पक्ष सोडला. त्यांना भाजपाने पक्षप्रवेशासाठी पायघड्या अंथरल्या. त्यांना उमेदवारीही देण्यात आली. शुध्दीकरण सुरू केलेय भाजपाने सध्या गुन्हेगारांना संरक्षण कोण देत आहे. गुन्हेगारांना-भ्रष्टाचार्यांना उमेदवारी कोण देत आहे. हे सर्वांना समजून उमजून चुकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जाहीरातीच्या माध्यमातून बेइज्जती करण्याचा भाजपाने प्रयास करू नये.महाराष्ट्राला बेइज्जत करण्याची भाजपाची भूमिका महाराष्ट्रातील माणूस कदापि सहन करणार नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
आरएसएसचे मुख्यालय असणार्या नागपुरात विजयादशमीला दरवर्षी आरएसएसचे संचलन होते. यंदाही झालेे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलेे. मात्र यावर्षी प्रथमच आरएसएसच्या प्रमुखांचे संपूर्ण भाषण दूरदर्शनवरून दाखविण्यात आले. दूरदर्शन सरकारी मालकीचे आहे. दसर्याच्या दिवशी डॉ.बाबासाहेव आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. या दिवशी राज्यभरातून नव्हे तर देशातून लाखोच्या संख्येने नागपुरात आंबेडकरांवरील श्रध्देपायी येतात.पण दुरदर्शनवर एक ओळही याबाबत आली नाही. दुरदर्शनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोहन भागवत महत्वाचे वाटतात ही चिंतेची बाब असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्र हिताची जपणूक आपणासच करावयाची असल्याने महाराष्ट्र त्यांच्या हाती देवून चालणार नसल्याचे सांगत शरद पवारांनी हिर्याला पैलू पाडणार्या उद्योगाचे उदाहरण दिले. या उद्योगातून १ लाख लोकांना रोजगार मिळत असून ११ हजार कोटीचा हा हिरे व्यापार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री येतात आणि गुजरातला येण्यासाठी हिरे व्यापार्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयास करतात. गुजरातला दुसरे केंद्र उघडा. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविण्याचा आणि महाराष्ट्राचे अर्थकारण बिघडविण्याचा भाजपाला कोणी अधिकार दिला, असा संतप्त सवाल यावेळी शरद पवारांनी उपस्थित केला.
कसाबप्रकरणामुळे सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. महाराष्ट्रात सागरी प्रशिक्षण पोलीस केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे कोकणच्या युवकांना रोजगार मिळाला असता आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळाली असती. हेच संरक्षण केंद्र गुजरातेत हलविण्याचा केंद्राचा विचार आहे. केंद्राने गुजराथमध्ये दुसरे संरक्षण केंद्र उघडावे आमची हरकत नाही अथवा गुजराथी बांधवाबद्दल मनात आकस नाही.गुजराथ आणि महाराष्ट्र भाऊ आहेत.पण केंद्राच्या भूमिकेमुळे मराठी व गुजराथी भाषिकांमध्ये आकस निर्माण होवू लागला आहे. गुजराथी व मराठी भाषिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. केंद्राला हे शोभत नाही. राज्याला आता भक्कम नेतृत्वाची गरज आहे. भक्कम नेतृत्वाची क्षमता केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असल्याने व केंद्राच्या महाराष्ट्रद्वेषी भूमिकेला ठणकावून सांगण्याची ताकद मतदानातून उपलब्ध झाल्याने ऐरोली व बेलापुर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी गणेश नाईक, संदीप नाईक, बाबासाहेब गोपले यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी व्यासपिठावर माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, गोपीनाथ ठाकूर, शशिकांत बिराजदार, कमलताई पाटील, भरत नखाते, स्थानिक नगरसेविका शिल्पा मोरे उपस्थित होते.
** विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा समाचार**
* ऐरोलीचे शिवसेना उमेदवार विजय चौगुलेंचा उल्लेख न करता राजकारणात हल्ली ३०२चे कलम असणे ही मोठी पात्रता समजली जात आहे.
* बेलापुरचे शिवसेना उमेदवार विजय नाहटा यांचा जेवण वाढणारा वाढपी असा उल्लेख केला.गावच्या पाटलांच्या घरी असणार्या गावजेवणाचा किस्सा सांगून वाढप्याने वाढले अथवा आग्रह केला तर त्याचे नुकसान होत नसल्याचा दाखला देत नवी मुंबईतील विकासकामांचे श्रेय घेणार्या नाहटांचा खरपुस समाचार शरद पवार यांनी घेतला.
* भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांचे नाव न घेता पूर्वी आमच्याकडे असणार्या महिलेला आम्ही पदे दिली. आमदारकी दिली. पण ही महिला कधीही भेटली की सतत नाईकांवरच टीका करायची, नाईकांच्याच तक्रारी करायची.समस्यांबाबत अथवा विकासाबाबत कधी चर्चा केली नाही. सतत नाईकच. मी त्यांना म्हटले की बाई रात्री झोपेत घरी नाईकांचे नाव घेवू नका.नाहीतर घरात भांडणे होतील.