सुजित शिंदे
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीमध्ये गणल्या जाणार्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असणारा बालेकिल्ला, गणला जाणारा बालेकिल्ला ढासळण्यास सुरूवात झाली असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेसने मुसंडी मारल्याने प्रस्थापितांसह अन्य पक्षीयांची समीकरणे बदलण्यास प्रारंभ झाला आहे.
आघाडी व महायुतीचाही काडीमोड झाल्याने विधानसभा निवडणूक सर्वत्र पंचरंगी होवू लागली आहे. एकीकडे बेलापुर मतदारसंघात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच दुसरीकडे शिवसेना, कॉंग्रेस, भाजपा व मनसेसह प्रकल्पग्रस्त आघाडीनेदेखील मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून निवडणूक चुरशीची करण्यास हातभार लावला आहे.
ऐरोली मतदारसंघाच्या तुलनेत बेलापुर मतदारसंघात परप्रातिंयाची अमराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. १९९९नंतर अमराठी परप्रातिंय मतदारांना मतपेटीत प्रथमच कॉंग्रेसचा ‘पंजा’ हे निवडणूक चिन्ह उपलब्ध झाले आहे. कॉंग्रेसने बेलापुर मतदारसंघातून प्रदेश सरचिटणिस व सिडको संचालक नामदेव भगतांसारखा मातब्बर पणाला लावून हा मतदारसंघ खेचून आणण्याचा निर्धार केला आहे. नामदेव भगत या मतदारसंघातून दुसर्यांदा विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. महापालिकेच्या दुसर्या सभागृहापासून आजतागायत ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्राची व येथील परिसराची व नागरिकांच्या समस्यांची, अपेक्षांची त्यांना पूर्ण जाणिव आहे. कंत्राटी कामगारांच्या कायम सेवेचा मुद्दा वादग्रस्त झाला असून आजतागायत त्यांची सेवा कायम झालेली नाही. कंत्राटी कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी महापालिकेच्या दुसर्या सभागृहात प्रस्ताव मांडला होता.
नवी मुंबईच्या शहरीकरणात स्थानिक असणार्या आगरी-कोळी समाजाच्या अस्तित्वाची, चालीरितीची बाहेरून येणार्यांना जाणिव व्हावी, नवी मुंबईच्या विकासात स्थानिक आगरी-कोळीचे योगदान, त्याग त्यांना समजावे यासाठी नामदेव भगत यांनी नेरूळला सिडकोच्या माध्यमातून आगरी-कोळी भवनाची निर्मिती केली. आगरी-कोळी भवनाचे शिल्पकार म्हणून बेलापुर पट्टीतील आगरी-कोळी त्यांना ओळखत आहे. गेल्या काही वर्षापासून नामदेव भगत हे आगरी-कोळी महोत्सवाचे यशस्वी व व्यापक प्रमाणावर आयोजन करत असून त्याला प्रतिसादही उत्स्फूर्त भेटत आहे. शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब व गरजू घरातील मुलांना पदवीपर्यतचे शिक्षण माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. शेजारील मराठी शाळा पटसंख्येअभावी ओस पडत चालल्या असताना शिक्षण प्रसारकचे हायस्कूल मराठी माध्यम प्रभावीपणे सुरू आहे.
नामदेव भगत यांनी गेल्यावेळी नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकही मतदारसंघ कॉंग्रेसला जागावाटपात न आल्याने संतप्त कॉंग्रेसी कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी, असंतोष व्यक्त करण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. १३ हजाराच्या आसपास मते स्वबळावर मिळविली. यंदातर कॉंग्रेसच्या ‘पंजा’ या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत. सोबतीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सानपाडा-पामबीचसह वाशीगावचे नगरसेवक दशरथ भगत, जुईनगरचे नगरसेवक रंगनाथ औटी, नेरूळ पूर्वचे तसेच पालिकेतील सर्वात ज्येष्ठ अनुभवी नगरसेवक संतोष शेट्टी,बेलापुरचे नगरसेवक अमित पाटील, नेरूळ पूर्वच्या नगरसेविका अनिता शेट्टी, नेरूळ गावातील हॅट्ट्रीकवीर नगरसेविका इंदूमती भगत, वाशीच्या नगरसेविका सिंधू नाईक आदी सात नगरसेवकांचा ताफा नामदेव भगत यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहे. तुर्भेसारखा झोपडपट्टी परिसर नामदेव भगत यांचे कडवट सहकारी नगरसेवक रामाशेठ वाघमारे सांभाळत आहेत. निशांत भगत, ऍड. रमेश त्रिपाठी, विजय वाळुंज, रविंद्र सावंत, मनोज मेहेर, तुकाराम कदम, नवनाथ चव्हाण, काशिनाथ उनवणे यासारख्या अनेक मातब्बर कार्यकर्त्यांची फौज नामदेव भगतांसाठी स्थानिक प्रभागातून मतदान काढण्याकरीता परिश्रमाची शिकस्त करत आहेत.
गतविधानसभेचा निवडणूक अनुभव गाठीशी असल्याने नामदेव भगत यांनी सुरूवातीपासूनच नियोजनात्मक प्रचारावर भर दिला असून प्रचाराची सर्व सूत्रे ते स्वत:च सांभाळत आहेत. मोक्याच्या ठिकाणी होर्डीग लावून मतदारांचे लक्ष वेधण्यात सर्वप्रथम नामदेव भगत यशस्वी झाले. मुस्लिम बांधवांसह रिक्षाचालकांचा पाठिंबादेखील नामदेव भगत यांनाच मिळाला आहे. आगरी-कोळी भवन, आगरी-कोळी महोत्सव, तसेच सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या प्रश्नांना दिलेली चालना यामुळे ग्रामस्थांमध्ये नामदेव भगतांचे वलय लक्षणीय आहे. अडीच एफएसआयबाबत संभ्रमावस्था कायम असतानाच सिडकोच्या सदनिकाधारकांना किमान तीन एफएसआय मिळाला पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम घेवून ती नामदेव भगत यांनी लावूनही धरली होती. सिडकोला हा ठराव मंजुर करून मंत्रालयीन मंजुरीस पाठविणे नामदेव भगत यांनी भाग पाडले. सिडको संचालक या नात्याने सिडकोच्या धोकादायक इमारतींत सातत्याने जावून नामदेव भगत यांनी ठेवलेला जनसंपर्क आज प्रचारात त्यांना उपयुक्त ठरत आहे. दिलीप आमलेसारखा वक्तृत्व निपुण कार्यकर्ता नामदेव भगत यांच्या संपर्क अभियानाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना सकाळपासूनच रात्री उशिरापर्यत प्रचाराची गाडी, माईक, मतदारांशी सुसंवाद आदी भूमिका दिलीप आमले सक्षमपणे पार पाडत आहे. परप्रातिंयाचा, झोपडपट्टीवासियांचाही नामदेव भगतांना पाठिंबा मिळू लागला आहे. कॉंग्रेसला फोडण्यात इतरांना यश न आल्याने नवी मुंबईतील बेलापुर मतदारसंघातील कॉंग्रेस एकसंधपणे, एकजीवपणे नामदेव भगत यांच्या प्रचारात सक्रिय योगदान देत आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार रॅली, चौकसभा, भेटी-गाठी आदी सर्वच प्रकारात कॉंग्रेसच्या नामदेव भगत यांनी मुसंडी मारल्याने बेलापुर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे.