नवी मुंबई / प्रतिनिधी
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी व शौचालय तसेच शाळेच्या आवारात साफसफाईची नितांत गरज असल्याचे मत नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. सौ. पाटील यांनी वाशी विभागातील नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांचा दौरा केला त्यावेळी त्या बोलत होत्या.
दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वाशी गावातील शाळा क्र. २७ मध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसून, दुसर्या मजल्यावरील मुतारीमध्ये पाण्याची गळती होत असल्याने मुतारीला टाळे ठोकण्यात आले आहे. तर, भिंतीवर रेखाटलेला भारताचा नकाशा पूर्णपणे भग्नावस्थेत निदर्शनास पडत आहे. जुहूगाव शाळा क्र. २९ मध्ये पहिल्या मजल्यावरील वर्गातील मुलांना पाणी पिण्यासाठी दुसरा मजला गाठावा लागत असल्याचे निदर्शनास आले. कोपरी गाव येथील शाळा क्र. ३० मध्ये सौ. पाटील येण्याच्या काही वेळेअगोदर साफसफाई उरकण्यात आली होती. तर, याच शाळेत पहिल्या मजल्यावर मुला-मुलींसाठी अशा दोघांना मात्र एकच (संयुक्त) स्वच्छता गृह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोपरी गावातील या शाळेमधील बहुतांश ठिकाणी भिंतींना तडे गेले असून, शाळेच्या पहिल्या मजल्यावर मुलांसाठी व मुलींना दुसर्या मजल्यावर स्वच्छतागृह शाळेतर्फे उपलब्ध केल गेले नाही. शाळा क्र. २८ च्या शालेय आवारात मोठयाप्रमाणात बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत होते. तर, विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी नळाला तोंड लावावे लागत होते. बांधकाम साहित्यामुळे स्वच्छतागृहाची पाईपलाईन चोकअप झाल्याने शाळेत दुर्गंधी पसरली असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे, पाणी एकाच जागी जमा होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची चर्चा शिक्षक व विद्यर्थ्यांमध्ये होती. अशी माहिती विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी दिली.
वाशी विभागातील शाळांच्या दौर्यादरम्यान समोर आलेल्या नकारात्मक बाबी व सकारात्मक सूचना यांचा आकृतीबंध अहवाल आयुक्तांसमोर मांडून समस्या व प्रश्न सुटत जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे मत सौ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा आढावा दौर्यामध्ये सौ. पाटील यांसमवेत, माजी नगरसेविका आरती शिंदे, शिवसेना वाशी उपशहरप्रमुख अश्विनी गुरव, जुहूगाव शाखाप्रमुख संजय पाटील, शाखाप्रमुख नागेश चव्हाण, उपशाखाप्रमुख पुरण पांडे, शाखा संघटक गीता पाटील, शिवसैनिक श्वेता पवार, आशिष भोईर तसेच शिक्षण विभागातर्फे केंद्रप्रमुख विलास भिसे, वाशी विभाग अधिकारी चौगुले व सबंधित कर्मचारी वर्ग उपस्थित होता.