* आमदार संदीप नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना
* कामचुकार कर्मचारी, अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश
* रुग्णांची आर्थिक लूट करणार्या खाजगी रुग्णालयांवर कारवाईचे आदेश
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई शहरामध्ये साथीचे रुग्ण आढळत आहेत. या रोगांपासून शहराला मुक्त करण्यासाठी डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांविरोधात शहरभर मोठया प्रमाणावर जनजागृती अभियान राबवा, अशी सूचना आमदार संदीप नाईक यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. साथीच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपचार करण्यात कामचुकारपणा करणारे पालिकेचे कर्मचारी आणि अधिकार्यांवर सक्त कारवाई करा. जे ठेकेदार साफसफाईच्या कांमात हलगर्जीपणा करत असतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
ऐरोली मतदारसंघाचे आमदार म्हणून दुसर्यांदा पदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर वाटल्याने मंगळवारी सकाळी आमदार संदीप नाईक यांनी तातडीने पालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील साथीच्या रोगांचा आढावा घेतला. तसेच या रोगांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना केल्या.
शहरातील नोड, गावठाण, झोपडपटटी अशा सर्वच भागात पालिकेने जनजागृतीपर अभियान मोठया प्रमाणावर राबवून साथीच्या आजारांची, त्यांच्या लक्षणांची आणि उपचारांची माहिती नागरिकांना द्यावी. त्यासाठी होर्डिग, पोस्टर्स, भित्तीचित्रे, माहितीपत्रके प्रसिध्द करावीत, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. धूर फवारणीसाठी मशिन्सची संख्या वाढवा.
अलिकडेच झालेल्या वादळात जी झाडे धाराशाही झाली होती. अशी झाडे अंतर्गत भागात आणि ठाणे-बेलापूर मार्गावर पडून आहेत. या झाडांची छाटणी केलेली नाही. ती छाटणी करुन ही झाडे स्वच्छ करावीत. कंडोमिनीयम अंतर्गत झालेल्या सिव्हरेज, पेव्हरब्लॉक आणि इतर नागरी सुविधांच्या कामांमुळे जर पाणी साचत असेल तर ते पाणी काढून टाकावे जेणेकरुन डासांच्या आळया तयार होणार नाहीत. तसेच विभाग स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी पेव्हरब्लॉकची कामे हाती घ्यावीत. शहरातील डेब्रीज तात्काळ उचला. साथ रोगांवरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारांसाठी कर्मचार्यांची संख्या वाढवा. ड्रेनेज आणि अंतर्गत नाल्यांची सफाई करा. सोसायटया, कंडोमिनियम गृहसंकुले, झोपडपटटया आणि प्रभागांमध्ये नियमित धूर फवारणी करा अशी महत्वाच्या सूचना केल्या.
अनेकवेळा डेंग्यू, अथवा मलेरियासारख्या साथीच्या आजाराची लागण नागरिकाला झालेली असते. मात्र रुग्णालयामध्ये त्याच्यावर योग्यवेळी आणि योग्य उपचार होत नाहीत. किंवा रुग्णाची आर्थिक लूट केली जाते अशा खाजगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
साथीच्या रोगांनी ग्रस्त नागरिकांची खरी संख्या कळण्यासाठी सर्व प्रकारच्या रुग्णालयांकडून आणि आरोग्य केंद्रांकडून दैनंदिन अहवाल मागविण्याचे निर्देश आमदार नाईक यांनी दिले. आरोग्य विभागाला अधिक गतिमान करा. ज्या घरांमध्ये साथीच्या आजाराचे रुग्ण आढळले आहेत त्या घरांच्या आजुबाजूच्या भागाचे सर्व्हेक्षण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा, असेही ते म्हणाले. रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा. अंतर्गत भागातील नालेसफाई करा, अशा सूचनाही केल्या. आपल्या शहराला साथीच्या रोगांपासून मुक्त करण्यासाठी सर्वपक्षीयांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. या प्रश्नी कुणी राजकारण आणू नये असे आवाहन करीत आमदार संदीप नाईक यांनी नागरिकांच्या सहभागाने आपले शहर साथरोगांपासून मुक्त करुया, असे आवाहन केले.
आमदार नाईक यांच्या सूचनांनंतर आयुक्त जर्हाड यांनी साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात बेजबाबदारपणा करणारे कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आमदारांना दिले. आयुक्त जर्हाड यांनी सर्व विभागीय अधिकार्यांना निर्देश दिले असून तातडीने आपापल्या विभागात जनजागृतीपर अभियान राबविण्याची तसेच साथीच्या रुग्णांची संख्या दररोज पालिकेला कळविण्याचे आदेश दिले आहेत.
साथीच्या रोग नियंत्रणासाठी पालिकेच्या सर्व विभागांचे सहकार्य घेण्याची सूचना आमदार नाईक यांनी केली असता आपत्कालिन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना या कामात समाविष्ठ करुन घेण्यात येईल, असे आयुक्त जर्हाड म्हणाले.
नवी मुंबईला साथीच्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी तसेच शहरात आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सशक्त नवी मुंबई अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली. या अंतर्गत नोव्हेंबर महिना संपेपर्यत नगरसेवक, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
आजच्या बैठकीत आमदार संदीप नाईक यांच्यासमवेत उपमहापौर अशोक गावडे, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, नगरसेवक रविकांत पाटील, नगरसेवक सुरेश सालदार, नगरसेवक कोंडीबा तिकोणे, नगरसेवक वैभव गायकवाड, नगरसेवक रविंद्र म्हात्रे, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका गौतमी सोनावणे, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, समाजसेवक शशिकांत राउत आदी उपस्थित होते. पालिका प्रशासनाच्यावतीने उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, सहशहर अभियंता श्री.राव, कार्यकारी अभियंता संजय देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, घनकचरा व्यवस्थापनप्रमुख बाबासाहेब राजळे, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख सुभाष गायकर आदी उपस्थित होते.
* आमदार संदीप नाईक यांनी केेलेेेल्या सूचना.
* कामचुकार कर्मचारी, अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा
* रुग्णांची आर्थिक लूट करणार्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा
* स्वच्छतेसाठी कंडोमिनियम अतर्गत पेव्हरब्लॉकची कामे सुरु करा
* ठेक्यात नमूद केल्याप्रमाणे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि छोटया नाल्यांची सफाई वर्षातून तीन वेळा करा
* ऐरेाली आणि नेरुळ येथील माता बाल रुग्णालयांच्या कामांना गती द्या