शिवसेना खासदार विचारेंंनी प्रशासनाला झापले
नवी मुंबई /प्रतिनिधी
नेरूळ येथील सेक्टर १६ ए मध्ये गार्डनच्या भूखंडावर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक पुढार्याने सात-सात माळ्यांच्या नऊ अनधिकृत इमारती उभ्या केल्या आहेत. सदर भूखंड २००७ मध्ये सिडकोकडून महापालिकेकडे उद्यानारक्षित म्हणून हस्तांतरीत झाला असून सध्याही तिथे उद्यान विकसित न होता अनधिकृत इमारती उभ्या करण्याचे काम सुरु आहे. हे सर्व राजरोसपणे सुरु असताना प्रशासन या बांधकामावर कोणतीही कारवाई करीत नाही, हे नवी मुंबईतील जनतेचे फार मोठे दुर्देव आहे, अशी खंत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी व्यक्त करून, जर आरक्षित भूखंड प्रशासनाला सांभाळता येत नसतील तर या महापालिकेला टाळे लावा, अशी कानउघडणीहि त्यांनी अधिकार्यांची केली.
खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त आबासाहेब जर्हाड यांची भेट घेऊन नवी मुंबईत विकास कामांमध्ये होत असलेल्या पक्षपातीपणा बद्दल जाब विचारला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, विजय माने, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांच्यासह शिवसेनचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. नेरूळ येथील सेक्टर १६ ए मध्ये गार्डनच्या भूखंडावर अनधिकृत इमारती उभा करणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आणि त्याला पाठीशी घालणार्या अधिकार्यांवर तडकाफडकी कारवाई करा. तुर्भे स्टोअर्समध्ये राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी सार्वजनिक शौचालय हायजॅक केले आहेत, ते तातडीने ताब्यात घ्या, नवीन रुग्णालयांच्या उद्घाटानांना जशी घाई केली, तशीच घाई आता हे रुग्णालये सुरु करण्यासाठीही करा, अशा सूचना विचारे यांनी यावेळी प्रशासनाला करून सत्ताधार्यांच्या इशार्यानुसार सुरु असलेल्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमच्या नगरसेवकाच्या कामाचे प्रस्ताव तयार केले जात नाहीत. काम करायचे असेल तर व्हाईट हाउसची एनओसी आणण्यास सांगितले जाते. हे धंदे आता बंद करा. जो काय निर्णय घ्यायचा आहे, तो येथेच घ्या. कुणाच्या सांगण्यावरून किंवा इशार्यावरून जर आमच्या नगरसेवकांना विकास कामे करताना हैराण केले जाणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी प्रशासनाला दिला. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कार्यक्रम तयार करण्यात यावा आणि कचरा वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, खाडी किनारी असलेली तिवरांची झाडे व छोटीछोटी असणारी तळे येथे दूर फवारणी करण्यात यावी अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.