* नगरसेविका माधुरी सुतार यांचा घणाघात
नवी मुंबई : शहरातील घनकचरा उचलण्याच्या विषयी शिवसेनेने शनिवारी महापालिका मुख्यालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या नगरसेविका माधुरी सुतार यांनी केला आहे.
वास्तविक कचरा उचलण्याच्या कामाचा प्रस्ताव महापालिकेच्या येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असल्याने आपली पोलखोल होईल या भितीने आणि आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी सेनेच्या नेत्यांनी मोर्चाचा स्टंट केला आहे. महापौर सागर नाईक यांनी देखील या प्रश्नाविषयी तोडगा काढण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. शहरातील घनकचरा उचलून डंपिंग ग्राउंडपर्यंत पोहोचविण्यासाठी एक उपयुक्त प्रस्ताव महासभेत यापूर्वी मांडण्यात आला होता मात्र या कामावरील खर्च जादा असल्याचा कांगावा करुन या प्रस्तावाला कॉंगे्रससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला होता. कॉंगे्रसने या प्र्रस्तावाविरोधात राज्याच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे या प्रस्तावाला राज्य सरकारकडून स्थिगिती देण्यात आली होती. या संदर्भात शासनाने मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची एक चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या चौकशी अहवालात कचरा उचलण्याच्या प्रस्तावामध्ये कोणताही नियमबाहय जादा निधी देण्यात आला नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे विरोधकांच्या मुस्काटात मारल्यासारखे झाले होते. कॉंगे्रस आणि शिवसेनेच्या उपद्रवी भुमिकेमुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करता आली नव्हती त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, असे नगरसेविका माधुरी सुतार म्हणाल्या. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेच्या पुढच्या स्थायी समिती सभेत येतो आहे आणि म्हणूनच फुकटचे श्रेय उपटण्यासाठी या प्रश्नी सेनेने मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा स्टंट केल्याची टीका त्यांनी केली. मात्र शहरात कचर्याचा त्रास कुणामुळे झाला हे नवी मुंबईकर चांगलेच जाणून आहेत, असा टोलाही सुतार यांनी लगावला आहे. शिवसेनेला जर मोर्चा काढायचाच असेल तर या प्रस्तावाविरोधात सरकारकडे नाहक तक्रार करणारे कॉंगे्रसचे नगरसेवक दशरथ भगत यांच्या घरावर काढावा, असेही नगरसेविका सुतार यांनी सेनेच्या नेत्यांना सुनावले आहे.