वाशीत चेन-स्नॅचिंग
नवी मुंबई : रस्त्यावरून पायी चालत जाणार्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मागून आलेल्या मोटरसायकलवरील एकाने खेचून पलायन करण्याची घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर १४ येथे घडली.
पुष्पा जनार्दन वैती या ५४ वर्षाच्या महिला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाशी सेक्टर १४ मधील चिंतामणी नगर सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात असताना पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील एक लाख रूपयापेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक इज्जपवार या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
कंटेनर-ट्रेलरसह ड्रायव्हर फरार
नवी मुंबई : मालकाने दिलेला माल इच्छित स्थळी न पोहोचविता ड्रायव्हर कंटेनर व ट्रेलरसह फरार झाल्याची घटना नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
कळंबोली ई-१ येथे राहणारे गणेश ज्ञानेश्वर करंडे यांनी आपल्या ट्रेलर व कंटेनरचा ड्रायव्हर शंकरनाथसिंह (रा. जोधपुर) यास गर्व्हनाईज ऑयन या कंपनीतून घेतलेला माल भिवंडीतील पनवेल तालुक्यातील करळ येथे पोहोचविण्यासाठी दिला. तथापि ड्रायव्हरने हा माल त्या ठिकाणी न पोहोचविता माल, कंटेनर-ट्रेलरसह पलायन केले. याप्रकरणी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अवघडे अधिक तपास करीत आहेत.
कळंबोलीत ऍक्टिव्हाची चोरी
नवी मुंबई : आपल्या राहत्या घरासमोर उभी केलेली होंडा ऍक्टिव्हा स्कूटी चोरीला जाण्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळंबोली सेक्टर १९ येथे घडली.
कळंबोली सेक्टर १९ मधील जोशी आळीतील घर क्रं ९५०, रूम नं ३ येथे राहणार्या विजय चिकूरडेकर यांनी सांयकाळी ७.१५ वाजता आपल्या घरासमोर होंडा ऍक्टिव्हा स्कूटी उभी केली. अर्ध्या तासाने ते घरातून बाहेर आले असता त्यांना आपली ऍक्टिव्हा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
वाशीत चेनस्नॅचिंग
नवी मुंबई : रस्त्याने पायी चालणार्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मागून आलेल्या मोटरसायकलवरील इसमाने खेचून पलायन करण्याची घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर १ येथे घडली.
ईश्वरी राजन मुगम या ६१ वर्षाच्या महिला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वाशी सेक्टर १ येथील रस्त्यावरून पायी चालत असताना मागून आलेल्या मोटरसायकलवरून एका इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक इज्जपवार या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
बसमध्ये मोबाईलची चोरी
नवी मुंबई : एनएमएमटीच्या बसमध्ये वाशी ते वाशीगाव दरम्यानच्या प्रवासात प्रवाशाच्या खिशातील मोबाईल चोरीला जाण्याची घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
विशाल कैलास टेमघेरे हा १८ वर्षाचा युवक एनएमएमटीच्या बस क्रं १०३ मध्ये दादर ते पनवेल असा प्रवास करत असताना वाशी ते वाशी गावदरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे अधिक तपास करीत आहेत.
केमिकलसह टँकर विकून ड्रायव्हर फरार
नवी मुंबई : मालकाने दिलेला माल इच्छित स्थळी न पोहोचविता टँकरसह केमिकलचा माल विकून ड्रायव्हरने पलायन करण्याची घटना नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
नेरूळ सेक्टर १७ येथे राहणारे सतनामसिंग हरभजनसिंग वाजवा यांनी आपल्या टँकरमध्ये एमएयू केमिकल्स भरून ड्रायव्हरला हा माल न्हावाशेवावरून सिल्व्हासा येथे घेवून जाण्यास सांगितले.तथापि ड्रायव्हरने मालासह कंटेनर विकल्याचे उघडकीस आले. सहाय्यल पोलीस निरीक्षक ढमाळे अधिक तपास करीत आहेत.
तुर्भेत रुळांना पोलिसांचे संरक्षण
नवी मुंबई : तुर्भे नाका येथे पादचारी पुलाअभावी नागरिकांना जीव धोक्यात घाऊन रेल्वेरूळ ओलांडावा लागत आहे. यातून होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
तुर्भे नाका येथील जनता मार्केटमध्ये जाण्यासाठी नागरीकांना रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. ठाणे वाशी रेल्वेमार्गामुळे हा परिसर दोन भागात विभागला गेला आहे. मात्र त्या ठिकाणी रेल्वे पादचारी पुल नसल्याने नागरीकांना रेल्वेरुळ ओलांडणे हाच पर्याय आहे. अशातच तेथे जनता मार्केटचा विस्तार हा रेल्वे रुळापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे रुळ ओलांडणार्या पादचार्यांना रेल्वे दिसत नसल्याने त्यांचे अपघात होत आहेत.
सततच्या अपघातांमुळे या ठिकाणी अनेकवेळा नागरिकांनी आंदोलने केली. मात्र तरीही प्रशासनाकडून पादचारी पूल उभारणीकडे दुर्लक्षामुळे तेथे घडणारे अपघात टाळण्याची भूमिका पोलीसांच्या खांद्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुर्भे नाका येथील रेल्वे रुळालगत रेल्वे पोलीसांचा बंदोबस्त लावला जात आहे. रुळांच्या दुतर्फा एकूण चार पोलीस नेमण्यात आले आहेत. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा बंदोबस्त लावला जात आहे.