अनंतकुमार गवई
नवी मुंबई : सानपाडा-पामबीच परिसर नवी मुंबईतील नावाजलेला परिसर असला तरी कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत येथे अधूनमधून समस्या निर्माण होतच असते. मोराज रेसिडन्सीसमोर स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी भुखंड उपलब्ध असतानाही पोलीस ठाणे अद्यापि का निर्माण होत नाही, असा सवाल स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येत आहे.
नवी मुंबईतील आकर्षित व लक्षवेधी विभागांपैकी सानपाडा-पामबीच हा एक परिसर. २०००-२००१च्या सुमारास या परिसराच्या नागरीकरणास खर्या अर्थांने सुरूवात झाली. प्रशासनाने या विभागाकरीता मोराज रेसिडन्सीसमोरच पोलीस ठाण्याकरीता स्वतंत्र भुखंड उपलब्ध करून दिलेला आहे. पूर्वी या ठिकाणी पोलीस ठाण्याचा भुखंड असा लोखंडी नामफलक होता. तथापि पोलीस ठाण्याची प्रतिक्षा करणारा हा फलकच आजमितीला चोरीला गेला आहे.
या ठिकाणी पोलीस ठाणे नसल्याने सुरूवातीच्या काळात घरफोडी, चोरी,वाटमारी वा अन्य गुन्हेगारी घटना घडल्यास स्थानिक रहीवाशांना तुर्भे पोलीस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत असे. ही तुर्भे पोलीस चौकी सानपाडा-पामबीच परिसरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असल्याने व रिक्षाला ८०-९० रूपये त्या काळात मोजावे लागत असल्याने रहीवाशांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. तुर्भे पोलीस ठाण्याकडून पेट्रोलिंग होत असली तरी ती माफक नसल्याने सुरूवातीच्या काळात सानपाडा-पामबीच परिसर गुन्हेगारीचे माहेरघरच बनले होते.
या ठिकाणी घरफोडी, चोरी-दरोडा असे गुन्हे अनेकदा घडलेे आहेत. गोळीबाराचे प्रकारही घडले आहेत. वाटमारीच्या असंख्य घटना घडून महिलांना रेल्वे रूळावरून छोटेखानी पादचारी पुलावरून येताना आपले सोन्याचे दागिनेही गमवावे लागले आहे. पामबीच परिसरातील प्रसिध्द असलेल्या बुधदेव मंदीराची दानपेटीही चोरण्याचा प्रयास झाला होता.
आजमितीला सानपाडा पामबीच परिसराची लोकसंख्या पन्नास हजाराचा टप्पा ओंलाडूंन पुढे गेली आहे. स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे याकरीता स्थानिक भागातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, भाजपाचे ऍड.रमेश त्रिपाठी, मनसेचे विलास घोणे, विठ्ठल गावडे यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावाही केलेला आहे. पोलीस चौकी ही पोलीस आयुक्तांच्या तर पोलीस ठाणे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीतील बाब असल्याने मंत्रालयातील गृहखात्याला सानपाडा पामबीच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचे गांभीर्य समजत नसल्याची नाराजी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षापूर्वी तुर्भे पोलीस ठाण्याचे विभाजन होवून नव्याने सानपाडा पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. सानपाडा पामबीच परिसरात मोराज रेसिडन्सीसमोर पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र भुखंड असतानाही पोलिस चौकी सानपाडा गणेश मंदीरालगतच उभारण्यात आली.
पोलीस ठाण्यासाठी भुखंड अविकसित स्वरूपात असल्याने या भुखंडाला बकालपणा प्राप्त झाला आहे. कचरा, मातीचे ढिगारे व काही प्रमाणात डेब्रिज या ठिकाणी पहावयास मिळत आहे. बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे या सानपाडा पामबीच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचे महत्व लक्षात घेवून या ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा स्थानिक भागातील रहीवाशी संतोषकुमार खांडगेपाटील यांनी व्यक्त केली आहे.