अनंतकुमार गवई
नवी मुंबई : अवघ्या चार महिन्यावर नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक आली असल्याने शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची साद घालत जन्माला आलेल्या मनसेच्या नवी मुंबई छावणीत मात्र कमालीची शांतता असून निवडणूक लढवावी की नाही या संभ्रमावस्थेत प्रभागाप्रभागातील मनसैनिक पहावयास मिळत आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघातील मतदानाची जमाबेरीज नऊ हजाराचाही आकडा गाठू न शकल्याने मनसेच्या छावणीत कमालीची शांतता आहे. गतमहापालिका निवडणूकीतही मनसेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. गतमहापालिका निवडणूकीत मनसेने ८९ जागांपैकी ६० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मनसेला एकही जागा जिंकता आली नाही, उलटपक्षी मनसे उमेदवारांना आपल्या अनामत रकमाही टिकविता आल्या नाही. घणसोलीतून कृष्णा पाटील व नेरूळमधून दत्ता घंगाळें व अन्य दोघा-तिघांचा अपवाद वगळता मनसेच्या उमेदवारांना फारशी मतेही मिळविता आली नाही.
मनसे स्थापनेच्यावेळी मनसेचा नवी मुंबईत जो बोलबाला होता, तो आता राहीला नसल्याने नवी मुंबईतील मनसेला आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. मनसेला सुरूवातीच्या काळात चांगला जनाधार असल्याने मागील लोकसभा निवडणूकीत राजन राजेंना मिळालेल्या मतदानावरून व बेलापुर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र महालेंना मिळालेल्या मतदानावरून मतपेटीतच स्पष्ट झाले होते. त्यानंतर मनसेच्या लोकप्रियतेला व जनधाराला ओहोटी लागली, ती आजतागायत कायम आहे.
नवी मुंबईतील मनसे गटबाजीच्या राजकारणात गुरफटली गेल्याने मनसेची आज वाताहत झाल्याचे मनसैनिक खुलेआमपणे बोलू लागले आहेत. गजानन काळे शहरअध्यक्ष झाल्यावर पक्ष भरारी घेईल, असा भोळाभाबडा आशावाद मनसैनिकांकडून व्यक्त केला जात होता. पण भलतेच घडत गेले. मनसेच्या स्थापनेच्या वेळी जे कार्यरत होते, ते जुनेजाणते, अनुभवी, मुरब्बी एकापाठोपाठ मनसे सोडून गेल्याने नवागतांना घेवून मनसे चालविण्याची जबाबदारी गजानन काळेंवर येवून पडली. मनसेची आंदोलनेही नवी मुंबईकरांना आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याने मिडीया मॅनेज आंदोलने हा ठपका मनसेच्या नवी मुंबईतील शिलेदारांवर पडला. मनसेत होत असलेली सातत्याने गळती व अन्य पक्षातील घटकांचा मनसेत येण्यास निरूत्साह पाहता मनसेचा नवी मुंबईतील डौलारा दिवसेंगणिक अधिकच ढासळू लागला आहे.
नवी मुंबईतून विधानसभा निवडणूकीत मनसेला ९ हजारही मतदान मिळविता आले नाही. गजानन काळेंसारखा शहरअध्यक्षपदाचा मोहरा निवडणूक रिंगणात असतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना बेलापुरात विशेष काही करून दाखविता आले नाही. ऐरोलीतही गजानन खबालेंसारखा मातब्बर उमेदवारही फारशी चुणूक दाखवु शकला नाही.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील प्रभागाप्रभागातील मतदान पाहिल्यावर निवडणूक लढवावी की या संभ्रमावस्थेत मनसैनिक दिसत आहेत. यंदा प्रथमच पॅनल पध्दतीने महापालिका निवडणूक होत असल्याने एकाच प्रभागात मतदान नाही तर दोन प्रभागातून कधी मिळणार असा चिंतेचा सूर मनसैनिकांकडून आळविला जात आहे.
राजसाहेबांनी विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील मतदान पाहिल्यावर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास कार्यकर्त्यांचे पैशाचे नुकसानही होणार नाही व निवडणूक निकालानंतर प्रतिष्ठाही जाणार नाही असा चर्चेचा सूर मनसैनिकांकडून आळविला जात आहे.