नवी मुंबई : राज्यातील मातब्बर राजकीय प्रस्थ गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्याच्या कानाकोपर्यात जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नगरसेवक व पदाधिकारी गणेश नाईकांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा द्यावा अशी उघडपणे मागणी करत आहेत, तर पक्षाचे नेते व माजी खासदार संजीव नाईकांनी सांगितले की तुमच्या भावनांचा आदर करतो, तुमच्या भावना मी गणेश नाईकांपर्यत पोहोचविण्याचे काम करतो. गुरूवारी सकाळी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात हा सर्व प्रकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर व कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्यासमोर सुरू होता. राष्ट्रबादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक व नवी मुंबईचे महापौर सागर नाईक कार्यकर्त्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत होते.
विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांचा पराभव हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या, नगरसेवकांच्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून काम करूनही दादांचा पराभव कसा होवू शकतो याचे शल्य त्यांच्या मनाला आजही खोल जखम करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज एकत्रित येवून तातडीने वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात नाईक समर्थकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला गणेश नाईक उपस्थित नसले तरी माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक उपस्थित होते.
नवी मुंबई माजी उपमहापौर व वाशीतील नगरसेवक आणि कडवट नाईक समर्थक म्हणून गणल्या जाणार्या भरत नाईकांनीच बैठकीचे प्रास्तविक करताना बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत दादांनी काय निर्णय घ्यावा, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, साबु डॅनियल, अनंत सुतार, किशोर पाटकर, अपर्णा गवते, रविंद्र इथापे, राजू शिंदे, शामराव महाडीक आदींनी भाषणे करताना आपली भूमिका मांडताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. नाईकांवर आपले कसे व कितपत प्रेम आहे याचा बेंबीच्या देठापासून टाहो फोडताना नाईकांमुळेच नवी मुंबईचा विकास झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोर पाटकर यांनी आताच पक्षाचा व पदाचा राजीनामा द्या, सुरूवात आमच्यापासून करतो असे सांगत कार्यकर्त्यांच्या आक्रमक व्यथा स्पष्ट केल्या.
कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिल्यावर सभागृहातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार संजीव नाईक यांना मार्गदर्शन करण्याची आवाजी मागणी केली. संजीव नाईकांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा आदर करत आपले मनोगत व्यक्त केले.
विधानसभा निवडणूकीनंतर नाईकसाहेबांमध्ये, नाईक परिवारामध्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये वा कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नैराश्य आले नसल्याचे भाषणाच्या सुरूवातीला संजीव नाईक यांनी स्पष्ट करून गेली अनेक वर्षे नाईक परिवाराला राजकीय भरती-ओहोटीच्या काळात प्रेम करणार्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
जय-पराजय नेहमीच जवळून पाहिले आहे. बाकीच्यांना संधी मिळावी म्हणून दादांनी महापालिका निवडणूकीत घरातील कोणी सदस्य उभा राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण दादा असे का बोलले याबाबत कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे हे स्पष्ट करते.वर्तमानपत्रात, सोशल मिडीयावर, टीव्ही चॅनलवर वेगवेगळी चर्चा होत असल्याने लोकांमध्ये वेगळा संदेश जात आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा नाईक परिवाराने नेहमीच आदर केला आहे. कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले पाहिजे, त्यांचे म्हणणे जाणून घेतले पाहिजे. शरद पवारसाहेबांची प्रकृती ठिक नाही. वर्तमानपत्रात आपण वाचलेच असेल. कार्यकर्त्यांच्या भावना , राग आम्ही समजू शकतो. गणेश नाईक साहेबांपर्यत तुमच्या भावना पोहोचविल्या जातील. तुमचे म्हणणे मांडले जाईल. पण हा विषय येथेच थांबवा. सभागृहाबाहेर वा खासगीतही याची परत चर्चा करू नका. नाईकसाहेबांचे तुम्ही चाहते आहात, नाईकसाहेबांवर तुम्ही प्रेम करता मग एवढे करा. घरातील चर्चा आता बाहेर नको.जनतेत चुकीचा संदेश जाता कामा नये. कार्यकर्त्यांनी आपले करत रहावे, दादांपर्यत तुमच्या भावना पोहोचविल्या जाणार असल्याचे सांगत संजीव नाईकांनी भाषणाचा समारोप केला.
भाषणामध्ये कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा, पदाचा त्याग करण्याचा आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी या वैठकीत केली. नाईक साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. नाईकसाहेब जिकडे आम्हीपण तिकडे या शब्दामध्ये कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत आपले प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत नखाते यांनी केले. कार्यकर्माच्या अखेरीस माजी मुख्यमंत्री बँ. अंतुले यांच्यासह अनेकांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.