अनंतकुमार गवई
नवी मुंबई : वर्षानुवर्षे उघड्यावर भाजीचा व्यवसाय करणार्या विक्रेत्यांना लवकरच पालिका प्रशासनाकडून बांधण्यात आलेल्या बंदीस्त भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पाटील यांच्या प्रयासामुळे भाजी विक्रेत्यांना हक्काच्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचा आधार उपलब्ध होणार आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये हनुमान मंदीरासमोरील व सिडकोच्या हिमालय – वरूणा या दोन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी असलेल्या मैदानात गेल्या अनेक वर्षापासून उघड्यावर भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत आहे. पालिका प्रशासनाकडून अनेक वेळा या भाजी विक्रेत्यांवर कारवाईदेखील झालेली आहे.
वर्षानुवर्षे मार्केट आवारात व्यवसाय करणार्या भाजी विक्रेत्यांना मैदानाच्या एका भागात हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पाटील यांनी भाजी मार्केटसाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. भाजी विक्रेत्यांची समस्या व स्थानिक रहीवाशांना असलेली भाजी मार्केटची गरज नगरसेवक नारायण पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
नगरसेवक नारायण पाटील यांच्या भाजी मार्केटप्रकरणीच्या अथक प्रयासाला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ३० गाळ्याच्या भाजी मार्केटचे काम सुरू झाले.प्रजासत्ताक दिनी या मार्केटचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असून भाजी विक्रेत्यांना नगरसेवक नारायण पाटील यांच्या प्रयासामुळे हक्काचे गाळे मिळणार असल्याचे समाधान या विक्रेत्यांच्या चेहर्यावर पहावयास मिळत आहे.