सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गुरूवारपासून नवी मुंबईतील राजकारण्यांच्या झोपा उडाल्या असून प्रभागाप्रभागातील राजकीय समीकरणेही बदलण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे एकीकडे पक्षीय पदाचे राजीनामे तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या होर्डिंगमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नावासह शरद पवारांना विश्रांती असे प्रकार घडू लागले आहे. १५ डिसेंबरनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपामध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण स्पष्ट झाले आहे.
गुरूवारी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात कार्यकर्ता मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी पक्षाच्या विरोधात आलाफ आळविताना पक्ष सोडण्याची व लवकरात लवकर गळ घालण्याची विनंती करण्यात आली. ज्यावेळी वाशीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गणेश नाईक समर्थक पक्षाच्या विरोधात गरळ ओकत होते, त्याचदिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वरिष्ठ घटकांकडून नवी मुंबईतील राजकीय आढावा तासागणिक घेतला जात होता. गणेश नाईक समर्थकांनी गुरूवारीच मेळावा घेतला असला तरी सोमवारपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रदेश पातळीवरून नवी मुंबईतील घडामोडींचा आढावा घेतला जात होता. सातारा,सांगली,कोल्हापुर, पुणे, नगर, नाशिकच्या नवी मुंबईस्थित घटकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वरिष्ठांकडून योग्य त्या सूचना देण्यात येत होत्या.
नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या महिन्यात होत आहे. महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर मतदारसंघातील मतदानाची जमाबेरीज केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास दुप्पट मतदान शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांना झालेले आहे. महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढविल्यास पराभव हमखास होणार हे जाणल्यानेच नगरसेवकांना अचानक ‘गौरव’ प्रेमाचा पान्हा फुटून ‘ताईं’चा लळा लागला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अधिकांश नगरसेवक ‘ताई’मय झाल्याने हे सर्व नाट्य घडवून आणले गेले असल्याची चर्चा नवी मुंबईच्या वर्तुळात सुरू आहे.
गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर या राजकीय शक्यतेने गेल्या चार दिवसात नवी मुंबईतील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. ताईंच्या माध्यमातून भाजपामय होण्यासाठी आतुर झालेल्या कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांसह एका मातब्बरांने तुर्तास ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. गणेश नाईकांनी त्यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक व अन्य नाईक समर्थंकांनी भाजपामय होण्याचा निर्णय घेतल्यास सर्वच राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपामय होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही पदाधिकारी, मातब्बर कार्यकर्ते व ठराविक नगरसेवक आजही शरद पवारांवर आपली निष्ठा व श्रध्दा कायम ठेवून असल्याचे गेल्या चार दिवसातील घडामोडीदरम्यान पहावयास मिळाले आहे.
प्रभागाप्रभागातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून काहींची यामुळे पुन्हा नगरसेवकपदाची स्वप्ने साकार होणार तर असंख्य इच्छूकांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाणार आहेत. नाईक परिवार भाजपामय झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस सांभाळण्यासाठी माथाडी नेत्यांसह अन्य काही मातब्बरांची चाचपणीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू झाली आहे. ऐरोलीत पोटनिवडणूक झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना निवडणूक लढवावी लागणार असल्याची चर्चा कोपरखैरणे, घणसोली कॉलनी,ऐरोली भागात सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसुप्रिमो शरद पवार पाय घसरून पडल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दुसर्याच दिवशी विष्णूदास भावेमध्ये या घडामोडी घडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांच्या चाहत्यांकडून , समर्थकांकडून कडवट नाराजीचा सूर आळविला जात आहे.नाईक उद्या भाजपामय झाले तरी पवारांना मानणारा पश्चिम महाराष्ट्रातील टक्का भाजपामधील नाईकांची पाठराखण करणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदारकी, दोन आमदारकी, महापौरपद, महापालिकेचा अकुंश इतके भरभरून दिलेले असतानाही पक्षाच्या पडत्या काळात पक्षत्याग याबाबतही नवी मुंबईत उलटसूलट चर्चा सुरू आहे.
नाईकांच्या भाजपाप्रवेशाच्या शक्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात जाणार्यांनीही तुर्तास आपल्या हालचालींना लगाम घातला आहे. आताच भाजपाप्रेम व ताईंशी असलेली सलगी जाहीर झाल्यास उद्या दादा भाजपामय झाल्यास आपणाला याची फार मोठी किमंत मोजावी लागणार असल्याची भीतीही त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. कॉंग्रेसमधील एका मातब्बरांची मात्र मोठ्या प्रमाणावर राजकीय अडचण झाली आहे. अवघ्या काही दिवसात कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांसह भाजपात जाण्याची जय्यत तयारी असतानाच नाईकांची भाजपाकडे वाटचाल हे समजल्याने त्यांनीही आपले भाजपाप्रेम आखडते घेतले आहे. उद्या भाजपात जावून नाईकांच्या चरणी मुजरा करण्यापेक्षा कॉंग्रेसमध्ये राहून विरोधकांचे प्रतिष्ठित जीवन जगू असा मानस या नेत्याने खासगीत व्यक्त केला आहे.
नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात गेल्या पाच दिवसांपासून नवनवीन अफवांचा जन्म होत आहे. गणेश नाईक व आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असून संजीव नाईक व सागर नाईक भाजपामय होणार असल्याच्या एका वृत्ताने भाजपा व राष्ट्रवादीत आणखीनच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी नवी मुंबईतील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेकजण अचानक मौनी बनले असून विरोधकांनीही ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अधिकांश घटक आजही पवार समर्थकच असल्याचे एकवार स्पष्ट झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी मालांच्या बाजारपेठांमध्ये नाईक समर्थकांचा नगण्य प्रभाव असल्याने नाईकांच्या भाजपा प्रबेशाच्या वृत्ताचा या ठिकाणी फारसा प्रभाव पडल्याचे पहावयास मिळाले नाही.