अनंतकुमार गवई
नवी मुंबई : क्रिडांगणाबाबतची नवी मुंबई महापालिका प्रशासनाची उदासिनता ही ठिकठिकाणी महापालिका स्थापनेपासूनच पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या क्रिडांगणाची दुर्रावस्था पाहिल्यावर महापालिका प्रशासनाचे व येथील राजकारण्यांचे क्रिडाप्रेमाचे दाखले उघडपणे पहावयास मिळत आहे. सानपाडा सेक्टर ८ मधील एका क्रिडांगणाला लोर्कापण झाल्यापासून अवघ्या ७ वर्षात अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आली आहे. हे मैदान चहूबाजूंनी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून ७ वर्षात या क्रिडांगणावर स्थानिक मुले कधी खेळताना पाहिली हाच संशोधनाचा विषय ठरला आहे.
सानपाडा सेक्टर ८ येथे नवी महापालिका प्रशासनाकडून हुतात्मा बाबू गेनू मैदान विकसित करण्यात आले असून १२ डिसेंबर २००७ रोजी महापालिका प्रशासनाने या मैदानाचे लोर्कापण केले. हे मैदान कार्यान्वित झाल्यापासून सातत्याने अतिक्रमणाच्या व सार्वजनिक तसेच राजकीय कार्यक्रमांच्या विळख्यात अडकल्याने स्थानिक मुलांना या मैदानाचा आजतागायत खेळण्यास वापर करताना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने या मैदानावर मुले खेळली कधी, क्रिडा स्पर्धा या मैदानावर झाल्या कधी हाच मुळी संशोधनाचा विषय बनला आहे.
मैदान कार्यान्वित झाल्यापासून परिसरातील रहीवाशांनी आपल्या चार चाकी वाहनांसाठी तसेच ट्रक वा अन्य वाहनांसाठी वाहनतळ म्हणून या मैदानांचा सर्रासपणे वापर सुरू केला. मैदानावर दगड, मातीचे वा डेब्रिजचे ढिगारेदेखील अधूनमधून पहावयास मिळाले आहेत. त्यानंतर स्थानिक भागातील धार्मिक मंडळींनी एकत्र येवून मैदानाच्या एका भागात गणेश मंदीराची स्थापना केली. या मंदीरानेही मैदानाचा बराचसा भाग व्यापला असून मैदानाशेजारी आज कोटा लाद्या पसरवून मैदानाचा बराचसा भाग गिळकृंत केला आहे.
सानपाडा पामबीच भागात मोराज रेसिडन्सीसमोर पोलीस ठाण्यासाठी गेल्या काही वर्षापासून स्वतंत्र भुखंड असतानाही गृहखात्याने याच मैदानावर तुर्भे पोलीस ठाण्याचा कारभार याच मैदानाच्या एका कोपर्यात सुरू केला. पोलीस ठाण्याने मैदानाच्या एका कोपर्यावरील बर्याचशा भागावर अतिक्रमण केले असून पोलिसांनी विविध गुन्ह्यात पकडलेली वाहनेदेखील याच मैदानात उभी केलेली पहावयास मिळतात. मैदानावरच पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस पोलीस कर्मचारी व अधिकार्यांच्या दुचाकी उभ्या केलेल्या पहावयास मिळतात. स्थानिक रहीवाशांची चारचाकी वाहनेदेखील याच मैदानावर २४ तास पहावयास मिळतात.
मैदानावर धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असल्याने मैदान खेळण्यासाठी स्थानिक मुलांच्या नशिबी फारसे कधी आलेच नाही. महापालिका प्रशासनानेदेखील या मैदानाचा वापर मुलांना खेळण्यासाठी होत आहे वा अन्य अतिक्रमणांनी व्यापले आहे याचीदेखील आजतागायत आस्थेवाईकपणे चौकशी केलेली नाही. मैदानावर गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, कोकण मेळावा, अखंड हरिनाम सप्ताह, हळदी-कुंकू समारंभ यासोबत राजकीय पक्षाच्या सभा वा कार्यक्रम नेहमीच या मैदानावर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
या मैदानाला महापालिका प्रशासनाने हुतात्मा बाबू गेनू यांचे नाव दिले असले तरी स्थानिक भागातील मुलांना खेळण्यासाठी या मैदानाचा फारसा उपयोग झालेला नाही. अवघ्या ७ वर्षात मैदानाची अतिक्रमणामुळे वाताहत झाल्याने क्रिडांगण खेळण्यासाठी नाही तर अतिक्रमणासाठीच महापालिका प्रशासनाने विकसित केले असल्याचा आरोप विभागातील मुलांकडून व क्रिडाप्रेमी रहीवाशांकडून केला जात आहे.