अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन ही केवळ घोषणाच झाली, पण त्या घोषणेची परिणामकारकरित्या अद्यापि अंमलबजावणी होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली कामगार महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
१) समान कामास समान वेतन या तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करा आणि वेतनामधील फरक दूर करा. २) जुलै २०१२ ते आजपर्यतचा म्हणजेच ३० महिन्याचा महागाई भत्याचा फरक द्या. ३) घंटागाडी त्वरीत सुरू करा, घंटागाडीवरील सर्व कामगारांना नोकरीवर घ्या आणि समान कामास समान वेतन द्या. ४) लिंक वर्कर या पदावरील महिला कर्मचार्यांना गेले ६ महिन्याचा पगार देण्यात यावा. लिंक वर्करना नोकरीचे आदेश त्वरीत देण्यात यावेत. दरमहा ७ तारखेपूर्वी त्यांना नियमितपणे वेतन देण्यात यावे. ५) शिक्षण खात्यातील सफाई पदावरील सर्व कंत्राटी कामगारांना समान कामाची समान वेतनाची थकबाकी देण्यात यावी. ६) ग्रॅच्यईटी (सेवा उपदानाची) रक्कम त्वरीत मिळावी. ७) रजेचे रोखीकरण पुर्ण पगाराने किंवा पुर्ण पगारी रजा देण्यात यावी. ८) कंत्राटी कामगारांसह त्यांच्या परिवारास मोफत आरोग्य सेवा मिळावी. ९) सामूहिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. १०) कंत्राटी कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी. ११) पाणीपुरवठा, मल:निस्सारण, विद्युत विभागातील कंत्राटी कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी. १२) वेतन पावत्या, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या कंत्राटदारांच्या एजन्सीचे कोड नंबर कामगारांचा खाते नंबर देण्यात यावा. १३) कंत्राटी कामगारांना चांगल्या प्रतीचे गणवेश, रेनकोट, चप्पल, बूट, मास्क, हॅण्डग्लोव्हज, साटबण वेळेवर पुरविण्यात यावेत. या मागण्यांच्या पूर्ततेकरीता नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर यनियनचे नेते ऍड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चा हा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांना तड लावण्याकरीता या मोर्चामध्ये कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी केले आहे.