संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून ओपन जीमचे लोेर्कापण
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार संघात सोयी-सुविधांची पूर्तता करण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य उत्तम कसे राहील, यावर आमदार संदीप नाईक यांनी आतापर्यंत यशस्वी भर दिला आहे. कोपरखैरणेतील प्रभाग क्रमांक ३३ आणि प्रभाग क्र. ३४ मधील रहिवाशांना त्यांच्यावतीने आरोग्यमय भेट मिळाली असून त्यांच्या आमदार निधीतून उभ्या करण्यात आलेल्या ओपन जीमचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते सोमवारी करण्यात आले आहे.
कै.शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानात या ओपन जीमची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये व्यायामासाठी विविध प्रकारची उपकरणे बसविण्यात आली आहेत.
ओपन जीमच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक व्याधी निर्माण होतात. या व्याधी टाळण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यासाठी ओपन जीमचा लाभ सर्वांना घेता येईल, असे ते म्हणाले.
रोगापेक्षा प्रतिबंध बरा आणि म्हणूनच प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळून व्यायाम करायला हवा, असे मत मांडले.
नवी मुंबई शहरात अशा प्रकारची ही पहिलीच जीम साकारली असून भविष्यात नागरिकांच्या मागणीनुसार इतर भागात अशा जीम उभ्या करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. उद्घाटनाप्रसंगी आमदार नाईक यांनी व्यायामाच्या प्रत्येक उपकरणाची पाहणी केली. याप्रसंगी प्रभागातील नागरिकांनी आमदार नाईक यांचा सत्कार करुन त्यांना धन्यवाद दिले.
नगरसेवक रविकांत पाटील, नगरसेवक सुरेश सालदार, माजी नगरसेवक कोंडीबा तिकोणे, माजी पालिका परिवहन समिती सदस्य रामचंद्र सूर्यवंशी, समाजसेवक संदीप म्हात्रे, अभिजीत म्हात्रे, हभप कानिफनाथ शिंगाडे महाराज, जयेश कोंडे, जगन्नाथ घोलप, रत्नाकर आवटे, भगवान खोपडे आदी मान्यवर ओपन जीमच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते.