अनंतकुमार गवई
नवी मुंबई : २१ व्या शतकातील शहर, मेगा सिटी, आधुनिक शहर, इको सिटी अशा अनेक संबोधनांनी ओळखली जाणारी नवी मुंबई येथील आधुनिकतेसोबतच प्रसन्न वातावरणामुळे नागरिकांचे आकर्षणकेंद्र ठरत आहे. नवी मुंबईचे भुरळ घालणारे हे चित्ताकर्षक वेगळे रूप टिपण्यासाठी व्यावसायिक छायाचित्रकारांप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे कॅमेरेही उत्सुकतेने सरसावताना दिसतात. महापालिका क्षेत्रातील अशा छायाचित्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिमा – नवी मुंबईची’ या अभिनव छायाचित्रण स्पर्धेचा निकाल नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी जाहीर केला आहे.
सुप्रसिध्द छायाचित्रकार रजनीश काकडे आणि श्रीनिवास आकेल्डा या छायाचित्रण क्षेत्रातील मान्यवर छायाचित्रकारांनी परीक्षण केलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १ जानेवारी २०१५ रोजी, सकाळी ११ वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिकेच्या २३ व्या वर्धापनदिन समारंभात संपन्न होणार आहे.
स्पर्धेकरीता छायाचित्रकारांच्या नजरेतून नवी मुंबईतील सर्वोत्तम तीन छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास अनुसरून व्यावसायिक गटात १७ तसेच हौशी गटात ६२ छायाचित्रकारांनी स्पर्धा सहभाग नोंदविला. पारदर्शक पध्दतीने स्पर्धा संपन्न व्हावी यादृष्टीने स्पर्धेकरिता प्राप्त २३७ छायाचित्रांचे परीक्षण करताना परीक्षकांना कोणत्याही स्पर्धकाचे नाव कळू न देता फक्त छायाचित्रामागे लिहिलेले स्पर्धकांचे अर्ज क्रमांक प्रदर्शित करण्यात आले होते.
व्यावसायिक गटात के.के.चौधरी, दिनेश पाटील, विवेक थोरात, नरेंद्र वास्कर, फारूक सय्यद, नंदकिशोर कुरणे, नितिन किटुकले या छायाचित्रकारांची सर्वोत्कृष्ट व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून निवड करण्यात आली. त्यांस प्रत्येकी रू.२० हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येतील.
हौशी गटात मेघा महाजन, सोनल म्हात्रे, संचित कांबळे, जगदिश कर्जेकर, पलक म्हात्रे या छायाचित्रकारांना सर्वोत्कृष्ट हौशी छायाचित्रकार म्हणून प्रत्येकी रू.१० हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येतील.
या स्पर्धेतील छायाचित्रकारांची गुणानुक्रमे क्रमवारी लावण्यात आली नसून व्यावसायिक गटातून सर्वोत्कृष्ट ७ तसेच हौशी गटातून सर्वोत्कृष्ट ५ छायाचित्रे निवडण्यात आलेली आहेत. वरील नमूद पारितोषिकप्राप्त छायाचित्रकारांचा नामोल्लेख हा पारितोषिकांचा गुणानुक्रम नसून त्यांचा अर्जानुक्रम आहे. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिका दिनदर्शिका २०१५ मध्ये केला जाणार असल्याचे नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी जाहिर केले आहे.