अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याचेच नाही तर उभ्या महाराष्ट्राचेच लक्ष बोनकोडेच्या नाईक परिवाराने गेल्या काही दिवसांपासून वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक आपल्या पुत्रांसह, समर्थक, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गणेश नाईकांचे पुतणे व भाजपाचे युवा नेते वैभव नाईक यांची आगामी काय भूमिका असणार याकडेदेखील राजकीय घटक ‘लक्ष’ ठेवून असल्याचे पहावयास मिळत आहे.
लोकसभा निवडणूकीपाठोपाठ बेलापुर विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट झाली. नवी मुंबईतून लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांना तब्बल ४७ हजारांपेक्षा अधिक मतांची पिछाडी मिळाली. गणेश नाईकांना बेलापुर विधानसभा मतदारसंघात अवघ्या १४०० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील अमराठी परप्रातिंय भाषिकांचा कौल भाजपाकडेच असल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले. व्यक्तिगत जनसंपर्क, सातत्याने मतदारसंघाच्या कानाकोपर्याची पायपीट, रोजगार मिळवून देण्यास दिलेली प्राथमिकता, गळती झालेल्या एकूणएक घराची पाहणी, केलेली कामे या निकषावर संदीप नाईकांनी मोदी लाटेतही नऊ हजाराचीआघाडी घेत ऐरोलीचा गड राखल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने बोनकोडेच्या नाईक परिवाराची प्रतिष्ठा काही अंशी कायम राहीली.
एप्रिल महिन्यात येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना धोक्याची घंटा स्पष्टपणे दिसू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढविल्यास आपणासही घरी बसण्याची पाळी येईल असे खुलेआमपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आपआपसात खुलेआमपणे बोलूही लागले. एरव्ही गौरव बंगल्याजवळूनही जाण्यास स्वारस्य नसणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची पायधूळ गौरव बंगल्याला लागू लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक खासगीत आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना सौ. मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वाचे गोडवे अचानक गायला लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकांश नगरसेवक लपूनछपून गौरव बंगल्याच्या सावलीत जावू लागल्याच्या वार्ता बोनकोडेलाही धडकूही लागल्या. त्यातच डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी व मातब्बर कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित करून उघडपणे ना. गणेश नाईकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करण्याची व नवीन निर्णय घेण्याची गळ घातली. या मेळाव्यास गणेश नाईक उपस्थित नसले तरी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक उपस्थित होते.
या घडामोडीनंतर नवी मुंबईसह ठाण्याचेच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष संभाव्य राजकीय घडामोडींकडे लागून राहीले आहे. दररोज नवनवीन चर्चांना उधान येत राहील्याने गेली महिनाभर गणेश नाईक हे सातत्याने मिडीयाच्या व जनसामान्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले. या कालावधीत गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन करण्यात आलेले नाही. तथापि गणेश नाईक हे भाजपातच प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून ठामपणे सांगितले जात आहे. देशातील सर्वोच्च उद्योजक याकामी स्वारस्य घेत असून गणेश नाईकांना विधान परिषद आणि मागील जुन्याच खात्यांपैकी एक खाते दिले जाणार असल्याचे राजकीय घटकांकडून पैजेंवरही सांगण्यात येत आहे. गणेश नाईकांनी याप्रकरणी काहीही वक्तव्य न केल्याने राजकीय गूढ वाढीस लागले आहे. मात्र नाईकांच्या निकटवर्तीय समर्थकांनी ‘ऑफ द् रेकॉर्ड’ चर्चा करताना राजकीय स्थंलातर प्रक्रियेला दुजोरा देण्यास सुरूवात केली आहे.
नाईकांच्या परिवारात वैभव नाईक हे युवा नेतृत्व गेल्या काही वर्षात भरभराटीस व विकसित झालेले आहे. नवी मुंबईचे माजी महापौर व लढवय्ये नेते कै. तुकाराम नाईक यांचे पुत्र आणि गणेश नाईकांचे पुतणे ही वैभव नाईकांची ओळख. ही ओळख सुरूवातीच्या काळातील होती. पण राजकारणात सक्रिय श्रीगणेशा गिरविण्यास सुरूवात केल्यावर त्यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली व एक सक्षम नेतृत्व म्हणून ते नावारूपालाही आले. नवी मुंबईत युवा वर्गात वैभव नाईकांचे नेतृत्व सर्वाधिक लोकप्रिय आहे. जमिनीवर पाय असणारा नेता, सर्वसामान्यांमध्ये सहजगत्या मिसळणारा नेता अशी प्रतिमा वैभव नाईकांची निर्माण झालेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सोशल मिडीयात आघाडीवर आहेत, त्याचधर्तीवर नवी मुंबईतील राजकारण्यांमध्ये वैभव नाईक गेल्या काही वर्षात फेसबुक व व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मिडीयामध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत.
काही काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात राहील्यावर गेल्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करत त्यांनी शिवसेनेच्या छावणीत प्रवेश केला. शिवसेनेचे युवा सेना नवी मुंबईप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारत थेट आदित्य ठाकरेंशी सलगी करण्यात वैभव नाईक यशस्वी झाले. विधानसभा निवडणूकीत शेवटच्या क्षणी वैभव नाईकांचे तिकीट कापले गेल्यावर त्यांनी भाजपात प्रवेश करून अखेरच्या क्षणी भाजपातून निवडणूक लढविली. तब्बल ४७ हजार मते मिळवित वैभव नाईकांनी नवी मुंबईच्या राजकारणात आपली दखल घ्यावीच लागणार असल्याचे संकेत मतपेटीतून दिले.
गणेश नाईकांबाबत राजकीय चर्चा व अफवा निर्माण होवू लागल्यावर अचानक वैभव नाईकांवरही राजकीय प्रकाशझोत पडण्यास सुरूवात झाली. गणेश नाईकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर वैभव नाईकांची आगामी राजकीय भूमिका काय असणार यावरही राजकीय चावडीवर चर्चा झडू लागल्या. त्यातच सध्या शिवसेनेच्या नवी मुंबई नेतृत्वाबाबत वादळ निर्माण झाल्याने वैभव नाईकांचा शिवसेनाप्रवेश आणि थेट नवी मुंबई जिल्हाप्रमुखपदाची सुभेदारी यावरही पैजा झडू लागल्या आहेत. वैभव नाईकांच्या वाढदिवसाला युवा सेनेच्या ठाणे व मुंबईतील मातब्बरांनीही आर्वजून हजेरी लावल्याने त्यांची युवा सेनेशी असलेली जवळीक उघडपणे पहावयास मिळाली आहे. गणेश नाईक भाजपात गेल्यावर वैभव नाईक काय करणार? पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळणार यावरही चर्चेत अथवा सोशल मिडीयामध्ये मतांतरे झडू लागली आहेत. संदीप नाईकांनी आमदारकीचा राजीनामा देवून भाजपातर्फे पुन्हा ऐरोलीची पोटनिवडणूक लढविल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील अथवा वैभव नाईक या नावांची चाचपणी करणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. गणेश नाईकांसारख्या मातब्बरांच्या राजकीय हालचालींसोबत वैभव नाईकांसारख्या युवा नेतृत्वाच्या हालचालींकडेही राजकीय घटकांचे लक्ष लागून राहीले आहे.