मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहासह जगत्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे त्रिमूर्ती मित्र मंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
श्री. संत गजानन महाराज मंदीर, डिंगोरे (जुन्नर) यांच्या प्रेरणेने या सप्ताहाचे व गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस व माजी सिडको संचालक नामदेव भगत आणि कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांच्या हस्ते कलशपुजन होणार आहे. जुईनगरमधील कॉंग्रेसचे नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या हस्ते विणापुजन होणार आहे.
या सप्ताहामध्ये पहाटे ५ ते ७ काकडा, ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथा पारायण, सांयकाळी ४ ते ५ हरिपाठ, ६ ते ७ संगीत भारूड, रात्री ८ ते १० किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज केदार (पंढरपुर), ह.भ.प नामदेव महाराज इगतपुरीकर, १०८ स्वामी सर्वानंदगिरीजी महाराज यांची प्रवचने होणार असून ह.भ.प केशवमहाराज शिवणे (लातूर), ह.भ.प यशवंत महाराज पाटील (कोल्हापुर), ह.भ.प विठ्ठल महाराज साबळे यांची किर्तने होणार आहेत. ह.भ.प विठ्ठल महाराज साबळे हेच (अकोट शेवगाव) काल्याचेही किर्तन करणार असून श्री.गणेश मंदीर भजन मंडळ, सेक्टर ६, कंतदर्शन दरबार भजन मंडळ सेक्टर ६, रामकृष्ण हरी संगीत भजन मंडळ शहाड यांचा जागर याच सप्ताहात होणार आहे. शनिवारी ३ जानेवारीला काल्याचे किर्तन झाल्यावर महाप्रसादाचे वाटपही केले जाणार आहे.
दिलीप किसनराव आमले हे या सप्ताहाचे नियोजक असून या सप्ताहामध्ये नेरूळ व सभोवतालच्या परिसरातील वारकर्यांनी मोठ्या संख्येने व भक्तिभावाने सहभागी होवून विठ्ठल नाम ज्ञानमृताचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प राजाराम महाराज चतुर यांनी केले आहे.