भाजपाच्या आमदारासंह जिल्हाध्यक्षांनीही आळविला सूर
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : भाजपाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून भ्रष्टाचारमुक्त नवी मुंबई महापालिका हे भाजपाने नवी मुंबईकरांसाठी राबविलेला संकल्प असल्याने भाजपामध्ये यापुढे भ्रष्टाचारी लोकांना कोणत्याही परिस्थितीत ‘नो एट्रीं’च असल्याने कार्यकर्त्यांने नव्या जोमाने कामाला लागावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी आणि बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले.
वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर तोफ डागत भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई महापालिका हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी नवी मुंबईतील भ्रष्टाचारी लोकांना यापुढे भाजपामध्ये ‘नो एट्रीं’च असल्याचे ठणकावून सांगत जिल्हाध्यक्ष रेड्डी व भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सध्या नवी मुंबईत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना, अफवांना भाजपाकडून पडदा पडला असल्याचे संकेत दिले.
सव्वा तीन महिन्यावर येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मंदाताई म्हात्रेंनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होेते.
सध्या सुरू असलेल्या नवी मुंबईतील राजकीय गोंधळाबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले की, या विषयावर मला अनेक पत्रकारांचे सतत फोन येत असून मी त्यांना ठणकावून सांगितले की, ‘आने के लिए सभी तैय्या है, पण लेनेवाला कौन है, ये भी तो मुझे बताओ’. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत घोषणा देत केंद्रात सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीमुक्त महाराष्ट्र सांगत भाजपाची सत्ता कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणली. भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई महानगरपालिका सांगत आपणास नवी मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर आणायचा असल्याचे जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
नवी मुंबई महापालिकेची सत्ता हातातोंडाशी आलेली अहे. कार्यकर्त्यांनी थोडीशी मेहनत केली तर आगामी महापालिकेत भाजपाला दोन तृतीयांश बहूमत अवघड नसल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष रेड्डी यांनी महापालिकेतील सत्ता संपादनाची गणिते कार्यकर्त्यांना आकडेवारीसहीत विश्लेषण करून सांगितली. केंद्र शासनासह महाराष्ट्र शासनाच्या कामाचा आढावा घेत त्यांनी पक्षसंघटनेसाठी सदस्य नोंदणी अभियानांचे गांभीर्य रेड्डी यांनी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपाने सातत्याने लढा दिला आहे. नवी मुंबईतील भ्रष्टाचार्यांशी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर लढा देत आपण बेलापुरची लढाई जिंकली आहे. भाजपाच्या दिशेने नवी मुंबईत वातावरण अनुकूल झाले असल्याने वातावरण ब्रेक करण्यासाठीच हा सर्व भ्रष्टाचार्यांचा खेळ सुरू असल्याची घणाघाती टीका आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली.
कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला जावा, मनोमिलाफ व्हावा या हेतूने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याचे सांगून सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, महापालिका निवडणूक आता तोंडावर आली असून भाजपाकडूनही निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली पाहिजे. लोकांना आपल्याकडून कामाची अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रभागात काय कामे झाली पाहिजेत. त्याची लेखी यादी द्या. कामे करवून घ्या. काम करणारा हक्काचा आमदार तुम्हाला प्रथमच उपलब्ध झाला आहे. कामाची यादी पाहिजे असेल तर जिल्हाध्यक्षांनाही द्या. ते मला देतील. कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूकीत महापालिका आपणास भाजपास खेचून आणावयाची असल्याचा सूचक इशारा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून केला.
नरेंद्र मोदीजींनी भाजपाच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न देशवासियांना दाखविले आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिका ही आपणास मोदींजींना भेट द्यायची आहे. महापालिका निवडणूकीत आपणास हार आली तर राज्यात व देशात वेगळे चित्र जाईल. कार्यकर्त्यांनी वॉर्ड पिंजून काढावा. व्यासपिठावर बसलेले पदाधिकारी व मी स्वत: आपणास ज्या ज्या कामासाठी लागतील, तेथे तेथे उपलब्ध होतील. कोणत्याही परिस्थितीत आपणास महापालिका जिंकायचीच असल्याचा नारा देत आमदार मंदाताई म्हात्रेंनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचे काम केले.
ज्या भ्रष्टाचार्यांच्या विरोधात आपण लढलो आणि जिंकलो, त्या भ्रष्टाचार्यांना भाजपात कदापि प्रवेश मिळणार नसल्याने अफवांकडे, चर्चांकडे कानाडोळा करून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करावे. कार्यकर्त्यांनी परिश्रमाच्या बळावरच पक्षाला बेलापुरात यश मिळवून दिले आहे. निवडणूकीत नवी मुंबईत ३० ते ३५ ठिकाणी आपण पहिल्या क्रमाकांवर होतो. ५ ठिकाणी दोन नंबरला होतो. मोठ्या संख्येने सर्वपक्षीय येत आहेत. माजी नगरसेवक आले आहेत. विद्यमान नगरसेवकदेखील मोठ्या संख्येने येण्यास तयार आहेत. अजून र्लाइनीत बरेच जण आहेत.मीच त्यांचा प्रवेश थांबवला आहे. घेताना चाळण लावावीच लागेल. महापालिका निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांना मेहनत तर करावीच लागणार आहे. १४ लोकांना सोबत घेवून बेलापुरची लढाई जिंकली, इथे तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहोत. आपण एकत्र काम केले तर कोण माईचा लाल आपणास हात लावू शकणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत मी चर्चा केली असता प्रवेशाबाबत नवी मुंबईतील कोणाशीही कसलीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
बलाढ्य शक्तिला मारण्यासाठी युक्तीचे गरज आहे. एफएसआयबाबत भाजपा सकारात्म असून लवकरच निर्णय होइरल. आयुष्यभर एकाच खोलीत काढणार्यांना एक आणखी खोली मिळालीच पाहिजे असे सांगत आपल्या दोन महिन्यातील कामाची माहिती देत आमदार मंदाताई म्हात्रेंनी कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी अभियानाचे महत्व स्पष्ट केले.
आपल्या प्रास्तविकपर भाषणात विजय घाटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रेंच्या कामाचा आढावा घेत एफएसआय, जलवाहतूक, जनता दरबार, आमदार निधी याबाबत विस्तृत माहिती सादर केली. आमदार निधीचा आरोग्यावर होणारा खर्चाची माहिती देत घाटे यांनी एफएसआय विषयावर सत्य माहिती कथन करत आजवर नवी मुंबईकरांच्या झालेल्या दिशाभूलीची चिरफाड केली.
यावेळी वर्षा भोसले, मारूती भोईर, भगवानराव ढाकणे, सुनील होनराव, एकनाथ मगरवार, गोपाल रावजी गायकवाड, रामचंद्र घरत यांनी समयोचित भाषणे करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम केले. यावेळी व्यासपिठावर दिलीप तिडके, वैशाली तिडके, सुनिल पाटील, सरस्वती पाटील, संगीता सुतार यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी होते.
भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते सीवूड्सचे दत्ता घंगाळे, सानपाडा पामबीचचे ऍड. रमेश त्रिपाठी, सारसोळे गावातील मनोज मेहेर यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणल्याचे ठळकपणे पहावयास मिळत होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्कातंत्र देण्याचे काम भाजपाने केले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर यांचे लहान बंधू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका उपाध्यक्ष धनाजी ठाकूर यांना प्रवेश देवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचेच घर ‘आलबेल’ नसल्याचा संदेश नवी मुंबईला दिला आहे.