अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवीन वर्षाची चांगली सुरूवात करून देण्याचा संकल्प नामदेव भगत संचालित अखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्या वतीने आखण्यात आला असून त्याचाच प्रयास म्हणून २ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांकरीता, ग्रामस्थांकरीता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत हे सातत्याने भरीव कार्य करत असून त्यांच्याच परिश्रमातून व प्रशासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून नेरूळ सेक्टर २४ येथे तलावानजीक आगरी-कोळी भवनाची निर्मिती झालेली आहे. गेल्या साडे चार दशकाच्या कालावधीत नवी मुंबई विकसित होत असताना या भूमीवर स्थानिक आगरी-कोळी समाजाचे योगदान, त्यांचे अस्तित्व, त्यांच्या चालीरिती, आचारविचार हे इतरांना कळावे या उद्देशाने आगरी-कोळी समाजबांधवांना एकत्रित घेवून नामदेव भगत यांनी काही वर्षापूर्वी आगरी-कोळी महोत्सवास सुरूवात केली. गेल्या काही वर्षापासून नियमितपणे या महोत्सवाचे आयोजन केले जात असून हजारो लोक या महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. बच्चे कंपनीसाठी आगरी-कोळी महोत्सव विशेष पर्वणी असते.
ग्रामसंस्कृतीचे जतन व्हावे, सांप्रदायिक एकता व एकात्मता वृध्दीगंत व्हावी, नवोदीत कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, ग्रामसंस्कृती व नागर संस्कृती यामध्ये विचारांचे आदानप्रदान व्हावे या जाणिवेने आयोजित करण्यात आलेेल्या या दहा दिवसीय महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन, वैद्यकीय शिबिराचे आयोजन, व्यवसाय मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच यावर्षी प्रथमच आगरी-कोळी महोत्सवाचे भव्य व्यासपिठ सामुदायिक लग्नसोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच बच्चे कंपनीसाठी भव्य फनफेअर व खवय्यांसाठी खास आगरी-कोळी पध्दतीच्या जेवणाची मेजवानी असणार आहे. याबरोबरच दहा दिवस आगरी-कोळी गीतांचा तडका उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे.
आगरी-कोळी संस्कृतीची जवळून पाहणी करण्यासाठी, या समाजाच्या चालीरिती समजून घेण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने आगरी-कोळी महोत्सवात सहभागी व्हावे असे भावनिक आवाहन महोत्सवाचे आयोजक अखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी केले आहे.