अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २३ वा वर्धापन दिन समारंभ दि. १ जानेवारी २०१५ रोजी नववर्षारंभदिनी साजरा होत असून १ जानेवारी १९९२ रोजी स्थापन झालेल्या महानगरपालिकेने मागील २३ वर्षात नवी मुंबई शहराला उल्लेखनीय कामांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत अग्रेसर ठेवलेले आहे.
मोरबे धरण प्रकल्पाने लाभलेल्या जलसंपन्नतेतून किमान दरात कमाल पाणीपुरवठा, देशी-परदेशी पर्यावरण तज्ज्ञांनी नावजलेला कच-यापासून खत व फ्युएल पॅलेट्स स्वरुपातील इंधन निर्मिती करणारा शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी शुध्द करणारी पर्यावरणशील अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रे, ग्रीन बिल्डींग मानांकीत देशातील वास्तूरचनेचा उत्तम नमुना मानली जाणारी महानगरपालिका मुख्यालय इमारत व तिच्या आवारातील देशातील सर्वात उंच विक्रमी प्रतिकचिन्ह स्वरुपातील राष्ट्रध्वज स्तंभ, सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींना एकाच छताखाली सुविधा पुरविणारे देशातील एकमेव इ.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा केंद्र, उद्योग व्यापाराच्या वाढीसाठी स्थानिक संस्था कराचा सर्वात कमी दर ठेवणारी महानगरपालिका, क्षेत्रातील १९५ आकर्षक उद्याने, ७१ मैदाने, आरोग्य-शिक्षण-परिवहन-लोककल्याणकारी योजना अशा विविध प्रकारचे उल्लेखनीय प्रकल्प, उपक्रम, कामांनी नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन हा महानगरपालिकेचा पर्यायाने नवी मुंबईतील तमाम नागरिकांचाही आनंदोत्सव आहे. म्हणूनच नवी मुंबईचे महापौर श्री. सागर नाईक आणि महापालिका आयुक्त श्री.ए.एल.ज-हाड यांच्या वतीने नवी मुंबईतील सर्व नागरिकांना नववर्षाच्या आणि महापालिका वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहेत.
२३ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लोकप्रतिनिधी, अधिकारी व पत्रकार यांच्यामध्ये दि. ३० डिसेंबर २०१४ रोजी स्व.राजीव गांधी क्रीडा संकुलात क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. २० डिसेंबरपासून अधिकारी-कर्मचारी यांच्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धाही संपन्न होत आहेत.
दि. १ जानेवारी २०१५ रोजी वर्धापनदिनानिमित्त सकाळी ११ वा. नवी मुंबईचे महापौर श्री. सागर नाईक यांच्या शुभहस्ते, महानगरपालिका पदाधिकारी-नगरसेवक यांच्या उपस्थितीत महानगरपालिका दिनदर्शिका २०१५ चे प्रकाशन होणार असून याच कार्यक्रमात प्रतिमा – नवी मुंबईची या नवी मुंबईताल व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांसाठी आयोजित छायाचित्रण स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न होणार आहे. स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त निवडक १२ छायाचित्रांचा समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आला असून हे महापालिका उपक्रमात लोकसहभागाचे प्रतिक आहे.
याच समारंभात ई-गव्हर्नन्सची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आणखी एका लोकहितकारी उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. महानगरपालिकेची मालमत्ताकर, पाणीपुरवठा, उपकर/स्थानिक संस्था कर यांची देयके आपल्या घरुन/कार्यालयातून भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, त्यामध्ये आणखी एक यशस्वी पुढचे पाऊल टाकीत सध्याचे अँड्रॉईड स्मार्ट फोनच्या वापराचे लक्षणीय प्रमाण बघता नागरिकांना कुठूनही हातातल्या स्मार्ट फोनच्या एका टचवर आपली महानगरपालिका कर देयके भरणा करणे शक्य होईल. या लक्षवेधी उपक्रमाचा शुभारंभ वर्धापनदिन समारंभात होणार असून त्यानंतर या वेगळ्या करभरणा प्रणालीची माहिती प्रसारमाध्यमांमार्फत जनमानसात पोहचण्यासाठी तेथेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापनदिनी विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंद यांचे गायन-नृत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत संपन्न होत असून त्या स्पर्धांचा व अधिकारी-कर्मचारी यांच्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सायं. ५ वा. संपन्न होणार आहे.
महानगरपालिकेचा वर्धापनदिन हा शहराचा उत्सव आहे ही संकल्पना नजरेसमोर ठेवून नवी मुंबई शहराचा आयकॉन बनलेल्या महानगरपालिका मुख्यालय वास्तूप्रमाणेच शहरातील वाशी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौक, ऐरोली येथील दिवा-कोळीवाडा चौक व इतर महत्वाच्या चौकात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या २३ वर्षांतील वाटचालीचा चित्रमय आढावा घेणारे लक्षवेधी प्रकल्प, मान्यताप्राप्त उपक्रम, लोकोपयोगी कामे यांचे माहितीपूर्ण प्रदर्शनही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक प्रदर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
अशा विविध कार्यक्रम आयोजनातून नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापन दिन हा सर्वांसाठी आनंदोत्सव व्हावा ही संकल्पना नजरेसमोर ठेवून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. सागर नाईक व महापालिका आयुक्त श्री.ए.एल.ज-हाड यांच्या वतीने करण्यात येत आहे.