नवी मुंबई : सामाजिक क्षेत्रात काम करताना नवी मुंबईमध्ये आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा उमटवणार्या गणेश पावगेंना नववर्षारंभी ‘शिवरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी मुंबईमध्ये गणेश पावगेंची शिवप्रेमी ही प्रतिमा असून त्यांच्या कार्याचा ‘शिवरत्न’ पुरस्कारानेच सन्मान झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचा उत्साह संचारला आहे.
सानपाडा येथील रहीवाशी असलेले गणेश पावगे यांचे शिवप्रेम जगजाहीर आहे. शिवकार्याची ओढ असलेले आणि शिव कार्याला हातभार लागावा या प्रामाणिक हेतूने स्वखर्चाने महाराज शिवाजी राजे भोसले यांच्या फ्रेम केलेल्या प्रतिमा वाढदिवसाच्या दिवशी भेट देण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून गणेश पावगे अखंडपणे राबवित आहेत. नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रणी असलेल्या स्वरराज प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख असलेले गणेश पावगे एक शिवसैनिक आहेत.
आतापर्यत जवळपास ५०० कुटूंबापर्यत शिवकार्य पोहोचविण्याचे कार्य पावगे यांनी केले आहे. त्यांच्या या शिवकार्याची दखल राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ या संस्थेने घेवून ३१ डिसेंबर २०१४च्या समाप्तीला व १ जानेवारी २०१५च्या सुरूवातीला रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी त्यांनी केलेल्या शिवकार्याबद्दल त्यांना ‘शिवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून ७ जणांना गौरविण्यात आलेे असून त्यामध्ये गणेश पावगे हे एकमेव नवी मुंबईकर आहेत. नवी मुंबईकर जनतेकडून गणेश पावगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याची भावनिक प्रतिक्रिया यावेळी गणेश पावगे यांनी व्यक्त केली आहे.