अनंतकुमार गवई
नवी मुंबई : भाविकांच्या उत्साहात जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा (कार्ला) पालखी पदयात्रेचा सोहळा रविवारी दि. ४ जानेवारी रोजी जुईनगर सेक्टर २३ मधून सकाळी १० वाजता सुरू झाला असून ६ जानेवारी रोजी सांयकाळी ४ कार्ला येथील एकवीरा आईच्या देवस्थानाजवळ ही पालखी पोहोचणार असल्याची माहिती गांवदेवी युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश चंद्रकांत भोईर यांनी दिली.
गांवदेवी युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्याचे आयोजन केले असून रविवारी सकाळी १० वाजता जुईनगर सेक्टर २३ येथील जुईनगर गावातील गांवदेवी मंदीरापासून देवीची आरती झाल्यावर पालखी प्रस्थान झाले आहे.
१३ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता गांवदेवी मंदीरात श्री सत्य नारायणाची पुजा व एकवीरा आईचा भंडारा आयोजित करण्यात आला आहे. सांयकाळी ७ वाजल्यापासून महाप्रसादाच्या कार्यक्रमास सुरूवात होणार असून सांयकाळी ८ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. नवी मुंबईच्या पंचक्रोशीत राहणार्या भाविकांनी मोठ्या संख्येने एकवीरा आईच्या भंडार्यात भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन शैलेश चंद्रकांत भोईर यांनी केले आहे.
पालखी सोहळा गांवदेवी मंदीरापासून सुरू झाला, त्यावेळी पदयात्रेतील भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी व पालखीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदीराजवळ जमा झाले होते. यावेळी युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष निशांत भगत, सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर, शिवसेनेचे विवेक सुतार पालखीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.