सारसोळे खाडीलगत बामणदेव मार्गावर मृतदेह
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईतील पंचक्रोशीत नवसाला पावणारा व भक्ताच्या हाकेला धावून जाणार्या बामणदेवाच्या मार्गावर रविवारी सकाळी दर्शनासाठी जाणार्या भाविकांना गळा चिरून जाळून टाकलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सारसोळेच्या खाडीअर्ंतगत असलेला बामणदेव हा भाविकांमध्ये श्रध्देचा विषय आहे. खाडीमध्ये मासेमारी करावयास जाणार्या कोळी लोकांचे रक्षण करतो. हिवाळा-उन्हाळा अगदी पावसाळ्यातही भाविक चिखल-गाळ तुडवित, डोक्यापेक्षा उंच वाढलेल्या गवतातून मार्ग काढत बामणदेवाच्या रक्षणासाठी येतच असतात.
रविवार, दि. ४ जानेवारी रोजी सारसोळे गावचे तसेच इतर परिसरातील भाविक बामणदेव मार्गावरून बामणदेवाच्या दर्शनासाठी जात असताना पामबीच मार्गावरून काही अंतर आतमध्ये जाताच त्यांना गळा चिरून जाळलेेला मृतदेह आढळून आला. भाविकांमध्ये खळबळ उडाली. भाविकांनी तात्काळ सारसोळे गावातील कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांना संपर्क केला. मनोज मेहेर यांनी तात्काळ नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप खांडगेपाटील यांच्यासह अन्य युवकांसमवेत घटनास्थळी भेट दिली. तात्काळ नेरूळ पोलीस ठाण्यात या घटनेची कल्पना दिली. गळा चिरून मुलीचा निर्घृण पध्दतीने खून करण्यात आला आहे. नेरूळ पोलिस आल्यावर ही हद्द सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. पामबीच मार्गावर पोलीस तपास व अन्य प्रक्रिया सुरू असेपर्यत बघ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.