ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदलांचा सल्ला
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : समाजातील वाईट प्रवृत्ती घालविण्याचे काम पत्रकारांनी जागृतपणे करण्याची गरज आहे. पत्रकारांना सर्व क्षेत्राचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. तसेच बातमी लिहीताना आपण समाजाला काय देतोय ते पत्रकारांनी पाहण्याची गरज असल्याचे मत ‘मुंबई मराठी पत्रकार संघां’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल यांनी व्यक्त केले.
जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशन, नवी मुंबईतर्फे हिंदी साप्ताहिक ‘महानगरी एक्सप्रेस’चे संपादक स्व. अंमलकुमार डे यांच्या स्मरणार्थ ‘भावांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘क्राईम’ या विषयावर बांदल मार्गदर्शन करत होते.
अवैध दारू, मटका धंदे, कुंटणखाने, लॉजमध्ये चालणारे अवैध धंदे याची बातमी बनविणे पत्रकारांचे काम नाही. अवैध धंदे वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याने ते बंद होत नाही. फक्त अवैध धंद्याची जागा बदलते. अवैध धंद्याची बातमी प्रसिध्द झाल्यावर उलट त्यांची जाहिरातबाजी होवून त्यांच्या धंद्याची सर्वांना माहिती होत असल्याचे बांदल यांनी सांगितले.
सध्या कार्बन कॉपी पत्रकारितेमध्ये वाढ झाली आहे. तसेच अतिउत्साही पत्रकारांचीही संख्या वाढ होत असल्याचे सांगत बांदल यांनी खंत व्यक्त केली.
पत्रकारांनी एकाद्या बातमीची माहिती देताना खोटे लिहू नये, पत्रकारांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण होणारे वृत्तांकन करू नये, पत्रकारांनी कोणाचीही नक्कल करू नये असे आवाहनही बांदल यांनी यावेळी केले.
पत्रकारितेत घटनास्थळी जावून वृत्ताकंन करणे महत्वाचे असते. घटनास्थळी गेल्यावर पत्रकारांना जास्त माहिती मिळते. आरोपांबद्दलची माहिती लिहीताना दुसरी बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे बांदल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना नमूद केले.
यावेळी व्यासपिठावर दै. नवभारतचे कार्यालयीन प्रतिनिधी राजित यादव, महानगरी एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक विनोद प्रधान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शैशवरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बाळासाहेब दारकुंडे यांनी केले.
या कार्यक्रमास नेरूळ विभागप्रमुख गणेश घाग, शिवसेना शाखाप्रमुख गणेश आंबेकर, पारिजात पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ, संतोष चिकणे, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष अकुंश वैती आदींसह नवी मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.