अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईला क्रीडा नगरी बनविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात असून अनुभवी व्यक्तींकडून क्रीडा प्रशिक्षण, स्पर्धा आयोजनातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे असे निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी नागरिकांच्या मागणीनुसार ऐरोली विभागात लवकरच बुध्दीबळाचा प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येईल व टप्प्याटप्प्याने सर्वच विभागात विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात दोन दिवस संपन्न झालेल्या महापौर चषक कॅरम व बुध्दीबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
महापौर महोदयांच्या शुभहस्ते बुध्दीबळ स्पर्धेतील नवी मुंबई महापौर ग्रँडमास्टर किताब सागर शहा (पुरुष खुला गट) तसेच निती गुप्ता (महिला खुला गट) आणि कु. आनंद नाडर (१५ वर्षा आतील मुले), वैभवी जाधव (१५ वर्षा आतील मुली), कु. अथर्व गावडे (१० वर्षा आतील मुले), कु. खुशी चौडकी (१० वर्षा आतील मुली) यांनी संपादन केला.
कॅरम स्पर्धेत पुरुष गटातील विजेतेपदाचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी श्री. साहेबराव गायकवाड यांनी पटकाविला, तसेच महिला गटात श्रीम. पी.पी.परब यांनी विजेतेपद संपादन केले. कॅरम स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तसेच बुध्दीबळ स्पर्धेत महापालिकेच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांचे समवेत सभागृह नेते अनंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे उपसभापती बाळकृष्ण पाटील, नगरसेवक मनोज हळदणकर, क्रीडा विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त दिवाकर समेळ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी महेश शर्मा व परविंदर सिंग, बुध्दिबळ असोसिएशनचे कार्यकारी अधिकारी सुभाष घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सहभाग लाभला असून बुध्दीबळ स्पर्धेत एक हजारहून अधिक तसेच कॅरम स्पर्धेत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या.