अनंतकुमार गवई
नवी मुंबई : आज नव्या पिढीत प्रचंड क्षमता आहे त्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो तर यामधूनच उद्याचे नामांकीत खेळाडू घडतील आणि ते आपल्या देशाचे नाव उज्वल करतील अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी बरेचदा क्रीडा विषयक उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याकडील खेळाडू परदेशात जात असतात. त्यामुळे यापुढील काळात महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणार्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात आपल्याकडे परदेशी अनुभवसंपन्न तज्ज्ञ परीक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पावले उचलले जातील असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एन.एम.एस.ए. स्पोर्टस् क्लबच्या तरण तलावात दोन दिवस संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी ६०० हून अधिक म्हणजेच दुप्पट स्पर्धकांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होत आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन केले, त्यामुळे त्यांच्यात आलेल्या आत्मविश्वासात अधिक भर पडली. भविष्यात हेच खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रम प्रस्थापीत करतील व आपलीच मुले नवीन विक्रम बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खुल्या पुरुष गटात विराज प्रभू (४ सुवर्ण पदके) व खुल्या महिला गटात ऋतुजा उदेशी (५ सुवर्ण पदके) यांनी नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेचा खुल्या गटातील जनरल चॅम्पियनशिप चषक पटकाविला.
१७ वर्षाआतील मुलांच्या गटात अथर्व फडके (३ सुवर्ण व २ रौप्य पदके) व मुलींच्या गटात त्रिशा कारखानीस (३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक) तसेच १४ वर्षाआतील मुलांच्या गटात सिध्दार्थ खोपडे (२ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक) व मुलींच्या गटात आदिती कदम (३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक) व इशा कडी (२ सुवर्ण व ३ रौप्य) हे जनरल चॅम्पियनशिपचे (विभागून) मानकरी ठरले.
१२ वर्षाआतील मुलांच्या गटात अरविंद इनामदार (२ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक) व मुलींच्या गटात पायल श्रीराव (३ सुवर्ण व २ रौप्य पदके), १० वर्षाआतील मुलांच्या गटात अंशुमन झिंग्रन (२ सुवर्ण व २ रौप्य पदके) व मुलींच्या गटात टिया कारखानीस (४ सुवर्ण पदके) त्याचप्रमाणे ८ वर्षाआतील मुलांच्या गटात ऋषभ दास (४ सुवर्ण व १ कांस्य पदक) आणि मुलींच्या गटात संवर आकुस्कर (४ सुवर्ण व १ कांस्य पदक) हे जनरल चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले.
महापौर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना एकुण २ लाखाहून अधिक रक्कमेची रोख पारितोषिके सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांसह प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी महापौर सागर नाईक यांचेसमवेत विरोधी पक्षनेता सौ.सरोज पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे, नगरसेवक राजू शिंदे व वैभव गायकवाड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू गोकुळ कामथ, राष्ट्रीय पंच संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील वर्षी आणखी जोमाने स्पर्धेत सहभागी व्हावे व आपली संपूर्ण क्षमता वापरुन अधिकाधिक उत्तम कामगिरी करावी असे महापौर सागर नाईक यांनी सूचित करत आगामी वर्षी जलतरणपट्टूंना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिक रक्केमेत भरीव वाढ करण्यात येईल असे जाहिर केले.
सातत्याने चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या ठाणे जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर जलतरण स्पर्धेमध्ये बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाईल, बटरफ्लाय अशा जलतरणाच्या विविध प्रकारांमध्ये वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धांत खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.