संदीप खांडगेपाटील – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : सारसोळे गावात घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने घरमालकासह त्याच्या पोलीस पत्नीवर वार करून जखमी करण्याची घटना ठाणे जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनली. नेरूळ पोलीसांसह नवी मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उठविले जात असतानाच नेरूळ पोलीसांनी या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या ४ दिवसात संबंधित हल्लेखोर चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
सारसोळे गावचे ग्रामस्थ रविंद्र पांडूरंग पाटील (वय ३६, धंदा नोकरी) हे नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेरूळ सेक्टर ६ सारसोळे गाव घरक्रमांक ५०१ येथे त्यांच्या पत्नी व मुलासह राहतात.
रविंद्र पाटील व त्यांची पत्नी ८ जानेवारी रोजी जेवण करून घर बंद करून घरात झोपले असताना ९ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास आवाज आल्याने ते जागे झाले, तेव्हा अनोळखी इसम किचन रूमचे खिडकीतून पळून जाण्याच्या तयारीत असताना दिसल्याने रविंद्र पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला व त्यास पकडण्याचा प्रयास केला असता चोरट्याने त्याच्याकडील धारदार हत्याराने रविंद्र पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तेव्हा पाटील यांची पत्नी विनंती पाटील (महिला पोलीस) या मदतीस आल्या असता चोरट्याने त्याच्या हातातील हत्याराने त्यांच्याही हातावर वार करून त्यांना जखमी केले.
या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रविंद्र पाटील व त्यांच्या पत्नीस शेजारच्या लोकांनी नेरूळ सेक्टर ६मधील सुश्रुषा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविंद्र पाटील यांनी सांगितलेले इसमाचे वर्णनाप्रमाणे व गुन्ह्याच्या एमओबीप्रमाणे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना खबर्याने माहिती दिली की, नेरूळ हद्दीत राहणारा एक गुन्हेगार हा सदर दिवशी घटनास्थळावर येवून गेला होता. त्याअनुषंगाने घटनास्थळी नवीन इमारतीचे काम करणार्या कामगारांकडे तपास केला असता, घटनेच्या दिवशी दुपारच्या वेळी एक बंगाली भाषा बोलणारा इसम याने सदर कामगाराकडे तेथे राहणार्या लोकांबाबत चौकशी केल्याचे निष्पन्न झाले. रविंद्र पाटील यांनी सांगितलेले आरोपीचे वर्णन व साक्षीदार कामगारांनी वर्णन सांगितलेला इसम हा एकच असण्याची खात्री पटल्याने त्याअनुषंगाने नेरूळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.
याबाबत अधिक तपास करता, घरफोडीचे गुन्हे करणारा अरविंद बंगाली हा गेल्या काही दिवसापासून रात्री-अपरात्री बाहेर फिरत असतो. तसेच तो कुकशेत व सारसोळे गावातही फिरत असतो याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला. नेरूळ सेक्टर २० परिसरातून आरोपीस जेरबंद करून त्याची अंगझडती घेता त्याचेजवळ धारदार शस्त्र व इतर चीजवस्तू मिळून आल्या. त्याचे अंगावर, हातावर व पायावर खरचटलेल्या निशाण्या आढळून आल्याने त्याबाबत त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात विविध धारदार हत्यार व घातक हत्यारे त्याचप्रमाणे घरफोडीची हत्यारे सापडली. आरोपीचे नाव अरविंद श्रीराम विश्वास (वय ३०) असे असून तो नेरूळ गाव, सेक्टर २०, काशिनाथ पाटील चाळीत रहात आहे. आरोपीच्या नावावर याअगोदर दोन गुन्ह्याची नोंद आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना रोख १० हजार रूपयाचे बक्षिस जाहीर केले आहे.