अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कुकशेत गांव हे नवी मुंबईतील गावांमध्ये सुनियोजितरित्या वसलेले गांव असून या प्रभागात सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुर्ततेचा आनंद आपल्याप्रमाणेच मलाही आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी याप्रसंगी बोलताना आपले नवी मुंबई शहर हे सर्वच नागरी सुविधांमध्ये देशातील एक नामांकित शहर मानले जात असून आज स्वच्छतेबाबत देशात ११ वा क्रमांक असला तरी आगामी काळात लवकरच कार्यान्वित होणार्या आर.एफ.आय.डी. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत घनकचरा वाहतुक प्रणालीमुळे आगामी काळात आपले शहर देशात सर्वोत्कृष्ट ३ क्रमांकात आणण्यासाठी सर्वच नागरिकांच्या सहयोगाने आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.
कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून आपल्या जनहितैषी कार्यप्रणालीतून अल्पावधीतच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात नावारूपाला आलेल्या नगरसेवक सुरज पाटील यांच्यामुळे कुकशेत गावाचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. नगरसेवक सुरज पाटील यांनी प्रशासन दरबारी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळेच कुकशेत गावात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा निर्माण होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्र.क्र. ७६, नेरुळ येथील से. १४ मध्ये कुकशेत भू,क्र. पी-११ येथे बांधण्यात येत असलेल्या व्यायामशाळा इमारतीच्या भूमिपुजन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुविधा कामांबद्दल स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रभाग समिती सदस्य डी.डी.कोलते, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश भगत, मिलिंद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक युवकांमध्ये व्यायामाची गोडी वाढून आरोग्य संवर्धन व्हावे या भूमिकेतून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असणारी ही ३ मजली इमारत ३ कोटी ११ लक्ष ९१ हजार इतकी रक्कम खर्च करुन उभारण्यात येत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही पहिल्या मजल्यावर सभागृह उपलब्ध असणार आहे. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था असणार असून तळमजल्यावर ३० वाहनांकरीता पार्किंग सुविधा असणार आहे. या व्यायामशाळा इमारतीमुळे कुकशेत व आसपासच्या नेरुळ परिसरातील नागरिकांना आरोग्य संवर्धनासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.