नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षसंघटनेत सक्रिय योगदान देणारे मनसेचे पांडूरंग गोरडे यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.
वाशीतील फोर्टीज हिरानंदानी रूग्णालयात शनिवार, दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घणसोली कॉलनीलगतच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या जुन्नर तालुक्यातील बस्ती (सावरगाव) या गावी मिना नदीच्या किनारी होणार आहे. त्यांच्या अंत्यविधीस मनसेसह भाजपा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंत्यविधीला मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगांवकर, माजी आमदार प्रकाश भोईर, मनसेचे मिरा-भाईंदरचे प्रमोद पाटील, मनसे कामगार सेनेचे मनोज चव्हाण, विनय भोईटे, इरफान शेख, भाजपाचे विजय घाटे, दत्ता घंगाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ललित सकट, शिवसेनेचे जितेंद्र कांबळी, किशोर शेवाळे, शिरीष पाटील, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजाजन काळे, शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले, धीरज भोईर, विनोद पार्टे, शहर सचिव संदीप गलुगडे, ऍड. कौस्तुभ मोेरे, मनसे सांस्कृतिकचे नवी मुंबई अध्यक्ष गिरीराज दरेकर, मनसेचे विभाग अध्यक्ष सतीश केदारे, सविनय म्हात्रे, ऍड. मंदार मोरे, उपविभाग अध्यक्ष विलास घोणे, मनविसे पनवेलचे संतोष गवस, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष कृष्णा पाटील , संजय पवार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्मशानभूमीत गोरडे यांना श्रध्दाजंली वाहताना माजी आमदार व मनसे नेते बाळा नांदगांवकर यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते. गोरडे यांनी आयुष्यभर जनसेवेचे काम केले. सातत्याने जनसेवेचा वसा जोपासल्याने या माणसाने आयुष्यात पैसा कमविला नाही. माणसे खूप कमविली. सुरूवातीला शिवसेनेसाठी व नंतर मनसे स्थापनेपासून पक्षसंघटनेला सातत्याने भरीव योगदान देण्याचे काम गोरडे यांनी केले. मनसेने सुरूवातीला नवी मुंबई शहर सचिव पद दिले. त्यानंतर विदर्भात मनसेच्या कामगार सेनेची जबाबदारी दिली. त्यांनी नागपूरपासून गडचिरोली, अमरावतीपर्यत कामगार सेना वाढविली. पक्षाला सर्वस्व देणार्या गोरडे यांनी घराचा विचार केला नाही. त्यामुळे या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पश्चात त्याच्या कुटूंबाची जबाबदारी पक्षाची आहे. पक्ष लवकरच याबाबत योग्य निर्णय घेईल असे सांगत बाळा नांदगांवकर यांनी गोरडेंना श्रध्दाजंली वाहिली. सुरूवातीपासून ते शेवटपर्यत अनेक वर्षे गोरडे हे नांदगांवकरांचे कडवट समर्थक राहील्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नांदगांवकरांना स्वत:ला सांभाळणे जड झाले होते.
भाजपाकडून विजय घाटे व मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनीही श्रध्दाजंली वाहत गोरडेंच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कामगार क्षेत्रातील नेतृत्वाची व कार्याची स्तुती केली.