नवी मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त पामबीच मार्गावरील सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असणार्या बामणदेवाचा भंडारा नवी मुंबईतील भाविकांचा नेहमीच श्रध्देचा व भक्तिचा विषय राहीलेला आहे. महापालिका प्रशासन व राज्य शासनाने गतवर्षात बामणदेव मार्गासाठी कोणतीही कार्यवाही न केल्याने यंदाही भंडार्यासाठी भाविकांना खाडीअर्ंतगत भागात कच्च्या व खाचखळग्याच्या मार्गानेच जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात सारसोळेच्या ग्रामस्थांचे बामनदेवाचे मंदीर आहे. आजही उन-वारा-पावसात बाराही महिने सारसोळेचे ग्रामस्थ आणि अन्य नवी मुंबईकर कच्च्या व खाचखळग्याच्या रस्त्यानेच बामनदेवाच्या दर्शनासाठी ये-जा करत असतात. बामनदेव हा सारसोळे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असून खाडीमध्ये मासेमारी करताना बामनदेवच आपले पिढ्या न् पिढ्या रक्षण करतो अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे. खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी रात्री-अपरात्री ये-जा करताना विंचू-साप-नाग व अन्य धोक्यांपासूनच बामनदेवच आपली मदत करत असल्याची सारसोळेच्या ग्रामस्थांची श्रध्दा आहे.
खाडीअर्ंतगत भागात नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. खाडीअर्ंतगत भागातील रस्त्यांची डागडूजी करताना वा डांबरीकरण करताना खारफुटी मोठ्या प्रमाणावर पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आली आहे. पामबीच मार्गदेखील खारफुटीच्या त्यागावरच निर्माण झाला आहे. पामबीच मार्गामुळे सारसोळेच्या जुन्या जेटीची जागा बदलावी लागली. आज त्या जुन्या जेटीच्या जागेवर पामबीच मार्गानजिक वाधवाचा टोलेजंग टॉवर खारफुटी भागातच निर्माण झालेला आहे. आजही वाधवा टॉवरलगतच खारफुटी असल्याचे व वनविभागाचे त्या ठिकाणी खारफुटीचे फलक असल्याचे फलक पहावयास मिळत आहे.
बामनदेवाकडे जाणार्या मार्गाची नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुरूवातीपासून आजतागायत उपेक्षाच झालेली आहे. बामनदेवाच्या मार्गाकडे जाणार्या मार्गाबाबत पालिका प्रशासनाने कच्च्या रस्त्याची डागडूजी वा डांबरीकरणही केलेले नाही. बामणदेवाच्या मार्गावर पूर्वी मिठागरे होती. या मार्गावर दररोज अडीच ते तीन हजार माणसांचा राबता असल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जात आहे. मिठागरे बंद झाल्यावर माणसांची वर्दळ कमी झाली. आज या मार्गावर फक्त मासेमारीसाठी व बामनदेवाच्या दर्शनासाठी सारसोळे ग्रामस्थांचीच ये-जा पहावयास मिळत आहे.
बामनदेव हा शंकराचाच अवतार असल्याचे सारसोळेतील वयोवृध्द ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावून जाणारा असा बामनदेवाचा महिमा असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येत आहे. श्रावणी सोमवारी मुसळधार पावसात चिखल तुडवित भाविक बामनदेवाच्या दर्शनासाठी येत असतात. सारसोळेच्या युवकांनी कोलवाणी माता मित्र मंडळाची स्थापना करून आठ वर्षापासून बामनदेव मंदीराचा जिर्णोध्दार करून महाशिवरात्रीच्या दिनी महाभंडार्यास सुरूवात केली. बामनदेवाचा मार्ग पक्का व डागडूजी करून डांबरीकरण करावा यासाठी सारसोळे गावातील भाजपाचे कार्यकर्ते व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर सातत्याने महापालिका, मंत्रालय व पालकमंत्र्यांचा जनता दरबार सातत्याने लेखी निवेदने देवून चपला झिजवित आहे. त्या मार्गावर खारफुटी असल्याचे सांगत महापालिका प्रशासन मार्गाची डागडूजी करण्यास नकारघंटा देत आहेत. वास्तविक त्या मार्गावर कोठेही खारफुटी नाही. दोन मोठी वाहने त्या मार्गावरून ये-जा करू शकतात. त्या मार्गावर कोठेही खारफुटी नाही. मात्र मार्गाच्या काही अंतरावर खारफुटी आहे. मागील पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात सातत्याने जावून मनोज मेहेर यांनी बामनदेवाच्या मार्गाच्या दुर्रावस्थेकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला. खाडीअर्ंतगत भागात खारफुटीची हत्या करून पालिका प्रशासनाने रस्ते बनविले, पण ज्या मार्गावर खारफुटीच नाही, त्या बामनदेव मार्गाची डागडूजी करण्यास महापालिका प्रशासन नकार देत असल्याने प्रशासनाविषयी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यानंतर बामनदेवाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गवत वाढीस लागते. खाडीत ओलसरपणा असल्याने व पावसाळ्यानंतर हिवाळा असल्याने या गवताला ओलावाच असतो. महाशिवरात्रीला बामनदेवाच्या भंडार्यात सहभागी होण्यासाठी व बामनदेवाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबई, पनवेल-उरण व ठाणे-कल्याणहून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने कोलवानी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वखर्चाने बामनदेव मार्गाची साफसफाई करत असतात. सुमारे महिनाभर मार्ग सफाईचा कार्यक्रम सुरू असतो. सर्व गवत काढणे, रस्त्यावरील चिखल काढून खड्ड्यांचे सफाटीकरण करणे ही सर्व कामे कोलवाणी माता मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्रमदानातून व पदरमोड करून करत असतात.
आगामी महिन्यात १७ फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बामनदेवाचा भंडारा असल्याने रविवार, दि. १८ जानेवारीला सारसोळेच्या ग्रामस्थांनी कोलवाणी मित्र मंडळाच्या माध्यमातून बामनदेव मार्गाच्या साफसफाईस सुरूवात केली. पामबीच मार्गालगत बामनदेव मार्गाच्या सफाईसाठी ग्रामस्थांची वर्दळ वाढू लागली की पामबीच मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना बामनदेवाचा भंडारा जवळ आल्याचे संकेत प्राप्त होतात.