नवी मुंबई : सामाजिक कार्य करताना नेहमीच जनताभिमुख व समाजाभिमुख उपक्रम राबविण्याची शिकवण मला माझ्या आईकडून प्राप्त झाली आहे. समाजकार्य हाच माझा खरा पिंड असून मी राजकारणात चुकून आल्याची खंत आई वत्सला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी व्यक्त केली.
आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ सेक्टर १२ येथील गांवदेवी मंदीरात राज्यस्तरीय महोत्सव स्पर्धेचे व कला गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नामदेव भगत बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर कॉंग्रेसचे नगरसेवक रंगनाथ औटी, नगरसेविका सौ. इंदूमती भगत, ग्रामविकास मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर म्हात्रे, नारायण पाटील, माजी नगरसेवक दत्तात्रय घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भजनरत्न अशोकबुवा म्हात्रे, नाट्य अभिनेते रघुनाथ पवार, भजनरत्न वासुदेव पवार, मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील, शाहीर शांताराम पाटील, लोककलावंत दामोदर शिरवाळे, मृदुंगमणी दामोधर घरत, गीतकार चंद्रकांत कडू, अनंतबुवा पाटील आदी ३१ कलावंतांना आई वत्सला स्मृती कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय भजन स्पर्धेत समर्थबुवा भजन मंडळ (वावंजे-पनवेल) या भजन मंडळाने राज्यस्तरीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळविले. त्रैलोक्य भजन मंडळ (पाषाणे-कर्जत), दत्तकृप्पा भजन मंडळ बोरीवली यांनी अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमाकांचे पारितोषिक मिळविले. तर हनुमान प्रासादिक भजनी मंडळ (बेतवडे), नागेश्वर महिला भजनी मंडळ (खानाव- खोपोली), विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ (बोरीवली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली.
उत्कृष्ठ गायक म्हणून अरूण म्हात्रे (ओमकार भजन मंडळ – गोठीवली) तर उत्कृष्ठ बालगायक म्हणून प्रसाद भालेराव (यशोदीप भजन मंडळ -सरळगाव, मुरबाड), श्रध्दा नितीन माळी (वैजयंता माता महिला भजनी मंडळ -सावळी रसायनी) यांनी पारितोषिके मिळविली. उत्कृष्ठ पखवाजवादक म्हणून गणेश सावंत (विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळ – बोरीवली), हेमंत तवटे (हनुमान प्रासादिक महिला भजनी मंडळ – बोरिवली), सुनील म्हात्रे (राजंणदेवी महिला भजनी मंडळ – कोपरखैरणे,) यांना प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक पारितोषिक मिळविले.
या राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या परिक्षणाचे काम भजनरत्न निवृत्तीबुवा चौधरी, तबला नवाज प्रदीप दिक्षित, भजनरत्न अशोकबुवा म्हात्रे यांनी पाहिले.