संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : गेल्या दीड पावणे दोन महिन्यापासून नवी मुंबईसह ठाण्यासह उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागून राहीलेल्या लोकनेते गणेश नाईकांबाबतच्या अफवा, चर्चा, चावडी गप्पांना सोमवारी सांयकाळी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात अखेर कायमचाच पूर्णविराम मिळाला असून आपली आगामी वाटचाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच निवडणूक चिन्हावर राहणार असल्याचे गणेश नाईकांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.
लोकनेते गणेश नाईकांनी विष्णूदास भावेमध्ये आल्यावर सर्वप्रथम आर.आर.पाटील व कॉम्रेेड गोविंद पानसरे यांना श्रध्दाजंली वाहून झाल्यावर भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने उत्सुकता काही सेंकदातच संपुष्टात आली.
भुतकाळात डोकावून वर्तमानात वावरताना भविष्यातील गोष्टींचे नियोजन करून वाटचाल करण्याबाबतचे कार्यकर्त्यांना निर्देश देवून लोकनेते गणेश नाईक आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, आपली वाटचाल ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच निवडणूक चिन्हावर राहणार असून भूतकाळातील विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकल्यास महापालिकेच्या पूर्वीच्या ८९ वार्डापैकी ४३ प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस एक नंबरवर होती. १५ ते २० प्रभागामध्ये १०० च्या आसपास मतांनी आपण पिछाडीवर होतो. नवीन प्रभागाची रचना पाहता आपण थोडासा सावधपणा बाळगला तर महापालिका निवडणूकीत यशापर्यत निश्चितच पोहोचू शकतो असा आत्मविश्वास लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीत ऐरोली मतदारसंघात आपणास यश मिळाले. बेलापुर विधानसभा मतदारसंघात जनतेपर्यत आपली कामे जनतेपर्यत पोहोचविण्यात अपयश आले. एमएमआरडीए परिसरात अनेक महापालिका असून ठाणे जिल्ह्यात ७ महापालिका आहेत. कोणाला आपणास दूषणे द्यायची नसून कोणाबरोबर आपणाला तुलनाही करावयाची नाही. नवी मुंबई महापालिका विकासात एक नंबरवर आहे. हे यश मिळाले ते नवी मुंबईकरांमुळेच. केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण आदी विविध विभागामध्ये सन्मान आपल्या महापालिकेला दिला जात आहे. महापौर व आयुक्तांनी जरी हे पुरस्कार स्वीकारले असले तरी हे नगरसेवक व जनतेच्या परिश्रमाचे द्योतक असल्याचे लोकनेते गणेश नाईक यांनी सांगितले.
१२ ते १३ मार्चला आचारसंहिता लागणार असून २० ते २२ एप्रिलला महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाचे व व्यक्तिचे नाव घेण्याची व कोणा व्यक्तिवर आरोप करण्याची आपली इच्छा नाही व तो आपला पिंडही नाही. आपली कामेच आपण जनतेपर्यत पोहोचविली तर यश आपलेच असल्याचा आशावाद लोकनेते गणेश नाईकांनी व्यक्त केला.
सर्वांनाच वाटते की आपण नगरसेवक बनावे, त्याची महत्वाकांक्षा चुकीची नाही असे सांगून लोकनेते गणेश नाईक पुढे म्हणाले की, प्रभागातील मतदारांचा रोख, उमेदवाराप्रतीची भावना, उमेदवाराचे कार्य, जनसामान्यातील प्रतिमा या बाबी विचारात घेवूनच उमेदवारी निश्चित केली जाणार. सर्वांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार. सर्वांच्याच पसंतीला पडेल असे १११ ठिकाणी आपण उमेदवार देणार आपण जाहीर करणार असल्याचे गणेश नाईकांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना आवाहन व विनंती करताना गणेश नाईक म्हणाले की, आपण देईल ती जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. उमेदवारांना कोणी शह-काटशह देण्याचा प्रयास केला तर तो माझा कार्यकर्ता असणार नाही. तसेच आपल्याच पक्षातील दुसर्याला पाडणारा, पराभूत करणारा कार्यकर्तादेखील माझा असणार नाही. गाफील कोणीही राहू नका. दादांनी सांगितले मग यश मिळणारच म्हणून कोणी गाफील राहू नका. नाहीतर तुमचा गणेश नाईक होईल. बर्याच गोष्टी आज टाळण्यासारख्या आहेत. मतभेद व इर्षा बंद करा. विरोधक आता तुम्हाला भेटतील. मनोभेद करतील. तुम्हाला तिकीट भेटणार नाही. अपक्ष रहा अथवा दुसर्या पक्षाचा विचार करा असे सांगतील. कोणाला थांबविण्याची माझी इच्छा नाही. सुर्योदयाबरोबर सुर्यास्त हा होतच असतो. कोणाचे साम्राज्य कायम राहत नाही. पण नैतिकता व सत्यपणा असणार्याचे साम्राज्य जनसामान्यात कायम राहत असल्याचे नाईकांनी सांगितले.
जनतेने आपणास का नाकारलेही परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. भूतकाळात आता डोकावण्याची गरज नाही. विरोधक आपल्या कार्याला छेद देवू शकत नाहीत. पण हरभर्याच्या झाडावर चढविण्याचे काम करतील. त्यांच्या भूलथापांना बळी पडलात तर तुमचा नाश तर होईलच, पण आपल्या सर्वांच्याच कार्याला त्यामुळे बाधा पोहोचणार असल्याचे गणेश नाईकांनी स्पष्ट केले.
ही महापालिका निवडणूक माझी आहे. कार्यकर्त्यांना यावेळी माझ्याकरता काम करायचे आहे. ७ मार्चला ७ वाजल्यापासून आपला प्रचार सुरू होणार आहे. त्यावेळी एक सभा होवून सुमारे १५ ते २० हजार कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्या दिवसापासून आपण स्वत: प्रत्येक वॉर्डात जाणार आहोत. मी कोणत्याही गोष्टीला महत्व देत नाही. नवी मुंबईकर जनता आजही माझ्यावर प्रेम करते. जनतेला काहीतरी आपणाकडून चुकल्याची जाणिव झाली आहे. त्या चुकीची दुरूस्ती करण्यास जनता उत्सूक आहे. आपलेच नगरसेवक निवडून येणार आहेत. त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपण नवी मुंबईच्या विकासाचे उर्वरित काम पूर्ण करणार असल्याचे सांगत लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे व्यासपिठावर होते. आजी-माजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकार्यांना नाट्यगृहात जागा न मिळाल्याने लोकनेते गणेश नाईकांनी त्यांना व्यासपिठावर बोलावून घेतले. यावेळी आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, विविध नगरसेवक कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित राहून गणेश नाईकांचे मार्गदर्शन ऐकत होते.