आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे टोलमाफीसाठी आंदोलन
नवी मुंबई : खारघर येथील नागरिकांसाठी जर तेथील टोल माफ होत असेल तर नवी मुंबईकरांसाठी वाशी आणि ऐरोली येथील टोल का माफ होवू नये?, असा खडा सवाल करीत या विषयी तातडीने निर्णय झाला नाही तर आज लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन भविष्यात अधिक तीव्र आणि वेगळया स्टाईलने करु, असा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबईकरांसाठी खारघर, वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करावा, या मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीतील आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले. यावेळी आमदार नाईक यांनी वरील अंतिम इशारा दिला.
खारघर टोलनाक्याच्या आसपासच्या गावांना जर टोल माफ होत असेल तर तोच न्याय नवी मुंबईकरांना का लागू होत नाही, असे सांगून खारघर, वाशी आणि ऐरोली येथे नवी मुंबईकरांना टोल माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली. खारघर आणि नवी मुंबईध्ये दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. नवी मुंबईकरांच्या टोलमुक्तीसाठी आज गांधीजींच्या विचारांनी केलेले नागरिकांचे आंदोलन भविष्यात वेगळ्या पध्दतीने होईल, असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. लोकनेते गणेश नाईक यांच्या विचारांनुसार काम करीत असताना आजचे हे आंदोलन लोकशाही पध्दतीने केले आहे. आयआरबी कंपनीचे संचालक म्हैसकर यांच्याशी देखील आपण चर्चा केली असून टोल संदर्भात नवी मुंबईकरांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी १/२वाही त्यांनी दिली. येत्या आठ दिवसात हा प्रश्न राज्य शासनाने लवकरात लवकर सोडवावा, असे सांगून नवी मुंबईकरांच्या टोलमुक्तीसाठी विधानसभेत जोरदार आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले.
नवी मुंबईकरांना टोल माफ करावा यासाठी आमदार संदीप नाईक यांनी यापूर्वी तत्कालिन आघाडी शासनाला तसेच विद्यमान युती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संदर्भात १ नोव्हेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून टोल माफ करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी हे पत्र पुढील कारवाईसाठी रस्ते विभागाच्या सचिवांकडे पाठविले आहे.
आज टोलविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये नवी मुंबई महापालिकेचे सभागृहनेते अनंत सुतार, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारख, नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, नगरसेवक तात्या तेली, नगरसेवक अशोक पाटील, शिक्षण मंडळ सभापती सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हा सदस्य जी.एस.पाटील, नगरसेवक चंद्रकांत पाटील, कोंडीबा तिकोणे, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, राष्ट्र्रवादीचे शहर युवक अध्यक्ष जयेश कोंडे, मिलिंद पाटील, नरेंद्र कोटकर, शशिकांत सुवर्णा, राजा धनावडे, हिरामन राठोड, अनिल नाक्ते, प्रकाश मंत्री यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.