संदीप खांडगेपाटील – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरजू नागरीकांना मोठ्या आजारावरील वैद्यकीय उपचारापासून वंचित रहावे लागू नये यादृष्टीने वाशी येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक रूग्णालयामार्फत संदर्भित केलेल्या वार्षिक ८०० आंतररूग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेने महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी दिली.
मंजुरीप्रसंगी बोलताना महापौर सागर नाईक यांनी हा लोकहिताय प्रस्ताव मंजूर होताना लोकनेते गणेश नाईक यांची गोरगरीब जनतेविषयीची आपुलकीची भावना बोलून दाखविली. अनेक रूग्णांना मोठ्या आजारावर होणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे अशा रूग्णांना उपचार उपलब्ध होण्याकरता सामाजिक जाणिवेतून काम करण्याची गरज आहे. याच भूमिकेतून लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांच्या वैद्यकीय पुढाकारातून हिरानंदानी रूग्णालयात ८०० रूग्णांना पूर्णत: मोफत उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याचे महापौरांनी विशेषत्वाने नमूद केले.
यामध्ये कॅन्सर, हॉर्ट अटॅक, किडनी अशा विविध मोठ्या आजारावरील व शस्त्रक्रियेवरील खर्च रूग्णांना करावा लागणार नाही. यामध्ये कॉटचे शुल्क, तज्ज्ञ वैद्यकीय शुल्क, वैद्यकीय तपासण्या, जेवण, औषधे, आवश्यक शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
याकरीता रूग्ण नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रूग्ण असणे आवश्यक असून रुग्णाच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.