नवी मुंबई : अवघ्या चार दिवसांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीकरता मतदान होणार असून नेरूळमध्ये सेक्टर सहा परिसरात अचानक झालेल्या राजकीय तणावाने नवी मुंबईचे लक्ष या परिसराकडे वेधले गेले आहे. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण करणार्या या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा प्रचार अभियानादरम्यान पहावयास मिळत असून प्रभाग 85 व 86 मध्ये विकासकामांचाच प्रचारावर जोर दिला आहे. प्रभाग 85-86च्या बकालपणा व असुविधांना मतदारही त्रस्त झाल्याने कुकशेत मॉडेलचा मतदारांवर प्रभाव पडत असल्याने प्रभाग 85-86चा आपला बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस कायम राखणार असल्याचे प्रचार अभियानाच्या अंतिम टप्प्यात स्पष्ट होवू लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या दुसर्या व चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराला विजयी केले होते. तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारानेही राष्ट्रवादी काँग्रेसचाच स्वीकार केला होता. यापूर्वी ऑक्टोबर 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत या परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली होती. मनोज मेहेर या युवकाने सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील समस्या सोडविण्याकरता आणि येथील जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याकरता प्रशासकीय पातळीवर केलेल्या संघर्षामुळे व पाठपुराव्यामुळे नवी मुंबईमध्ये तसेच सोशल मिडीयामध्येही नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसर सतत चर्चेत राहीला. या नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसराकरता मनोज मेहेरने तब्बल सात हजाराहून अधिक लेखी तक्रारींचा पाऊस पाडल्याने, महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा केल्याने, जनता दरबारात हेलपाटे मारल्याने येथील समस्या, बकालपणा, असुविधा नवी मुंबईकरांच्याही निदर्शनास आल्या.
मनोज मेहेर हा गावाच्या विकासाकरता आणि नेरूळ सेक्टर सहाच्या सुविधांकरता संघर्ष करणारा युवक एव्हाना नवी मुंबईच्या परिचयाचा झालेला आहे. गावाच्या विकासाकरता या युवकाने नगरसेवक सुरज पाटील यांच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराच्या विकासाचा लोकनेते गणेश नाईक यांच्याकडून शब्द घेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
प्रभाग पुनर्रचनेत सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा परिसर मिळून प्रभाग 86 ची निर्मिती झाली आहे. हा प्रभाग आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जमाती महिलांकरता आरक्षित झाला आहे. सौ. जयश्री ठाकूर या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भालचंद्र (भाऊ) मढवी, मनोज मेहेर, यशवंत तांडेल, अशोक आतकरी, दिपक म्हात्रे, सौ. ज्योती म्हात्रे, महादेव पवार, ज्ञानेश्वर विश्वासराव यांच्यासह सारसोळे गावाचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उतरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाचा एकमेव मुद्दा प्रचारात वापरला जात असून सारसोळे गावाचा बकालपणा, समस्या या ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत.
प्रभाग पुनर्रचनेत सारसोळे गावाचा काही भाग, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा काही परिसर मिळून प्रभाग 85 ची निर्मिती झाली आहे. हा प्रभाग आरक्षण प्रक्रियेत महिला ओबीसी राखीव झाला आहे. या प्रभागाच्या प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चसुशिक्षित उमेदवार सौ. सुजाता सुरज पाटील स्वत: सांभाळत आहेत. त्यांना विभागातील रहीवाशी, पत्रकार व नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप खांडगेपाटील सहकार्य करत आहेत. शिवम सोसायटीसमोरील अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी त्यांनी प्रशासनदरबारी मोठा संघर्ष केला होता. सन 2005 ते 2010 या काळात नेरूळ सेक्टर सहामधील समस्या सोडविण्यासाठी संदीप खांडगेपाटील यांनी हजारोच्या संख्येने पाठपुरावा केला होता. मूषक संहार, धुरीकरण, गटारांची सफाई व अन्य नागरी कामे खांडगेपाटील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करवून घेत असल्याचे शिवम सोसायटी तसेच सभोवतालच्या नागरिकांनी सतत जवळून पाहिले आहे. गतपाच वर्षात शिवम सोसायटीला भेडसावणार्या अधिकांश नागरी समस्यांचे निवारण मनोज मेहेर यांनी केले आहे. शिवम सोसायटीच्या पदाधिकार्यांना नागरी समस्यांच्या निवारणासाठी मनोज मेहेर यांनाच संपर्क करून कामे करवून घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुजाता सुरज पाटील यांनी विकासाचा मुद्दा व समस्यांचा बकालपणा हाच मुद्दा प्रचारात वापरत दोनदा घरटी जनसंपर्कातून परिसर पिंजून काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरेसह अन्य घटकही प्रचारात हिरीरीने उतरले आहेत.
शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. संजीव नाईक यांच्या प्रचार रॅलीला नेरूळ सेक्टर सहा परिसरात समाजमंदीरालगत अडथळे निर्माण करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकाराबाबत दबक्या आवाजात स्थानिक नागरिकांमध्ये उलटसूलट चर्चा सुरू आहे. रॅलीला नाही तर विकासकामांना अडथळे निर्माण केले जात असल्याचा संदेश यातून स्थानिक जनतेला गेला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. प्रभाग 85-86 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा विडा नगरसेवक सुरज पाटील यांनी उचलला आहे. प्रभागातील युवा वर्ग, सुशिक्षित वर्ग सुरज पाटील यांच्या विकासकामांकडे आकर्षित झाल्याचे पहावयास मिळत आहे. डॉ. संजीव नाईकांच्या रॅलीला निर्माण करण्यात आलेला अडथळा जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात वापरला जाणारा विकासाचा मुद्दा आणि सध्या असलेला बकालपणा, असुविधा यावर भर दिला जात असल्याने मतदारांमध्ये राजकीय जागृती होवू लागली आहे. त्यातच काही दिवसापूर्वीच शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, युवा सेनेचे अध्यक्ष परब व महिला आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी गेली पाच वर्षे शिवसेनेची शाखा होती, तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार कार्यालय बनले आहे. काही शिवसेना पदाधिकारी स्थानिक भागात राष्ट्रवादीमय झाल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढीस लागली आहे.