कोल्हापूर- विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपला स्वत:ची ताकद कळली नसती, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्याच्या भाजप कार्यकारीणीच्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे नव्हते, याची फडणवीस यांनी खंतही व्यक्त केली.
कोल्हापूर येथे आज ( शनिवार) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते प्रदेश भाजपच्या तीन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या अधिवेशनाला राज्य मंत्रिमंडळांतील मंत्र्यांसह राज्यभरातून पदाधीकार्यांनी हजेरी लावली आहे.
शिवसेनेसोबत युती तुटल्यामुळेच भाजपला स्वबळावर 100 हून अधिक जागा मिळाल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यात एक कोटी सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपची सदस्यसंख्या 10 कोटी आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे, असेही गौरवोद्गार फडणवीसांनी काढले.
* रावसाहेबांनी भाजपला करोडपती बनवले…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सदस्यसंख्येत करोडपती बनवले आहे. त्याचप्रमाणे भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्यात अमित शाह यांचा मोठा वाटा आहे. तसेच पक्षाच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांचा मोठा हातभार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
विधानसभेत भाजपला छत्रपतीं शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या रयतेचा आशीर्वाद मिळाल्याचेही फडणवीस म्हणाले. भाजप सरकार पाच वर्षे उत्तम काम करेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र आणि राज्यात सरकारचे उत्तम काम सुरु असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
* भाजपला शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महारांजांचा विसर
निवडणुकीच्या काळात छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशा घोषणा देत महाराष्ट्राची सत्ता मिळवणार्या भाजपला मात्र अधिवेशनाला छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराजांचा विसर पडला आहे. कारण, कोल्हापुरात अधिवेशनाच्या निमित्ताने झळकलेल्या पोस्टरमध्ये ना शिवरायांचे, ना ही राजर्षी शाहू महाराजांचे छायाचित्र आहे. त्यामुळे करवीरवासियांकडून मोठी नाराजी व्यक्त होते आहे.
* निम्म्या मंत्रिमंडळाचा तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम
अधिवेशनाचे उद्घाटन आज (शनिवारी) झाले असले, तरी शुक्रवारी सायंकाळी येथील रेसिडेन्सी क्लबवर कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या वेळी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, आशिष शेलार, प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अनेक अन्य पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. रात्री उशिरा अमित शहा हेदेखील या चर्चेत सहभागी झाले.
* गुळाची ढेप आणि कोल्हापुरी चप्पल
अधिवेशनाला आलेल्या 500 पदाधिकार्यांना उद्घाटनाआधी गुळाची ढेप आणि कोल्हापुरी चप्पल भेट देण्यात आली. तसेच महालक्ष्मीच्या मंदिरात सर्व मंत्री दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांनाही स्वतंत्र प्रसाद देण्याची श्रीपूजकांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे.