अलिबाग : अलिबाग नगर परिषदेच्या जागेवर बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेली रायगड बाजारची इमारत जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्याची कारवाई शुक्रवारपासून सरू करण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
1983 रोजी अलिबाग नगर परिषदेच्या आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली होती. या बांधकामाबाबत या नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात 2001 रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अंतीम सुनावणी दरम्यान न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी ही ही इमारत पाडण्याचे आदेश 30 मार्च 2013 रोजी देण्यात आले होते.
या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या बांधकामाबाबत अलिबाग तालुका खरेदी विक्री संघाने या याचिकेविरुध्द न्यायालयात अपील दाखल केले होते. पण न्यायालयाच्या निकालानंतर अपीलकर्त्यांनी आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे न्यायालयात सांगितले.
त्यामुळे ही अनधिकृत इमारत पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, शरद पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते.