मुंबई : स्वित्झर्लंडमधील स्विस बँकांमध्ये खाती असलेल्या परदेशी नागरिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात पाच भारतीय असून त्यात तीन महिला व्यावसायिकांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडमध्ये ज्या खातेदारांची चौकशी सुरु आहे, त्याच खातेदारांची नावे जाहीर करण्यात आली असून स्वित्झर्लंडतर्फे सरकारी राजपत्रावर ही नावे करण्यात आली आहेत. जाहीर केलेल्या या यादीमध्ये अमेरिकन आणि इस्त्राइलमधील खातेदारांचाही समावेश आहे.
बँकेने जाहीर केलेल्या नावांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती यश बिर्ला आणि मुंबईतील दोन महिलांसह पाच भारतीयांचा समावेश आहे. स्नेहलता सहानी आणि संगीता सहानी अशी या मुंबईतील महिला खातेदारांची नावे आहेत. तर दिवंगत बांधकाम व्यावसायिक पाँटी चढा यांचा जावई गुरजित सिंग कोचर आणि दिल्लीतील महिला व्यावसायिक रितिका शर्मा यांचेही या यादीत नाव आहे.
यावेळी संबंधित खातेदारांना आपल्याबद्दल अधिक माहिती भारताला का देऊ नये किंवा तत्सम आक्षेपाबद्दल न्यायालयात जाऊ शकतात असे स्विस फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) म्हटले आहे. तसेच त्यासाठी त्यांना 30 दिवसांचा कालावधी देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, या खातेदारांची नावे जाहीर करताना स्विस बँकेने स्नेहलता सहानी आणि संगीता सहानी यांच्या नावांसोबत फक्त त्यांची जन्म तारीख प्रसिद्ध केली आहे. अन्य कोणताही माहिती यावेळी देण्यात आलेली नाही.
स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेच्या यादीत यश बिर्ला यांचे नाव आहे, मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास बिर्ला यांनी नकार दिला.