ठाणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील जवळपास चार हजार निवासी डॉक्टर गुरुवार सकाळपासून अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. या संपाचा मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
संपामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना असणार्या मार्डने आपल्या दहा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंडाडा यांनी ही माहिती दिली.
डॉक्टरांच्या सुरक्षेची यात प्रमुख मागणी आहे. मागच्या पाच वर्षांपासून आम्ही आमची सुरक्षा गार्ंभीयाने घ्या असे सरकारला सांगत आहोत पण अजूनही काहीही फरक पडलेला नाही.
रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरला मारहाण होते असे मुंडाडा यांनी सांगितले. बुधवारी रात्री मार्डचे शिष्टमंडळ आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली.
सरकार आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत आहे मात्र ठोस लिखित स्वरुपात सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळाले नाही त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला असे मुंडाडा यांनी सांगितले. यापूर्वी १२ जून रोजीही विनोद तावडेंसोबत चर्चा केली होती. पण त्यावेळीही तोंडी आश्वासन मिळाले होते असे मुंडाडा म्हणाले.