पनवेल : मागच्या काही वर्षात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन गँगमध्ये टोळी युध्दाची कोणतीही बातमी नसल्याने, या दोघांमधील शत्रूत्व संपले असा सर्वांचा समज झाला होता.
मात्र दाऊद आजही राजनबरोबरचे आपले हाडवैर विसरलेला नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच दाऊदने छोटा शकीलच्या मदतीने छोटा राजनच्या हत्येचा कट रचला होता.
राजनच्या सुदैवाने त्याला आधीच या कटाचा सुगावा लागल्याने दाऊदचा कट फसला. शकीलने राजनच्या भारतातील एका विश्वासू सहकार्याला फोडून राजन रहात असलेल्या ठिकाणाची माहिती घेतली. राजन ऑस्ट्रेलियात न्यूकॅसले भागात वास्तव्याला होता.
गुप्तचर यंत्रणा भारतातील दाऊदच्या माणसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. एप्रिल महिन्यात कराचीहून भारतातील एका क्रमांकावर दूरध्वनी आला होता. दोघांमध्ये हिंदी आणि ऊर्दू संमिश्र भाषेत संवाद झाला. त्या संभाषणातून या कटाची माहिती मिळाली.
राजन ऑस्ट्रेलियात न्यू कॅसलेमध्ये रहात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर छोटा शकीलने मध्यपूर्व आशियातून काही शूटर्सना तिथे पाठवले. कुठल्याही परिस्थितीत राजनला संपवा अशा सूचना या शूटर्सना दिल्या होत्या.
पण राजनच्या हितचिंतकांनी आधीच ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवल्याने राजन तेथून सुरक्षित स्थळी निसटला आणि काही तासातच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्या अज्ञात स्थळी निघून गेला.
यापूर्वी २००० साली बँकॉकमध्ये दाऊद टोळीने छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला होता. पण त्यावेळी केवळ नशिब बलवत्तर असल्याने राजन या हल्ल्यातून बचावला होता. त्यानंतर राजनने या हल्ल्याच्या सूत्रधारांना संपवण्याचा सपाटा लावला होता.
१९९३ साली दाऊदने मुंबईत घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर राजन दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला. त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर दोन्ही गँगमध्ये जोरदार टोळीयुध्द झाले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये दोन्ही गँगमध्ये कोणतीही गँगवॉरची बातमी न आल्याने दोघांनी परस्परांशी जुळवून घेतल्याची चर्चा सुरु झाली होती.