नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवांमुळे अमेरिकेला जाणार्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याची घटना ताजी असतानाच आता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जूंसाठी एअर इंडियाच्या विमानातून लहान मुलासह तीन प्रवाशांना उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना मागच्या महिन्यातील २४ जूनची आहे. किरण रिज्जू आणि जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांना लेहवरुन नवी दिल्लीला जायचे होते. पण एअर इंडियाच्या विमानात जागा नव्हती.
अखेर रिज्जू आणि निर्मल सिंह यांना जागा करुन देण्यासाठी हवाई दलाचा अधिकारी त्याची पत्नी आणि मुलाला विमानातून खाली उतरवण्यात आले तसेच या दोन्ही मंत्र्यांमुळे विमान उड्डाण तासाभर विलंबाने झाले.
आपल्यामुळे विमान उड्डाणाला विलंब झाल्याचा आरोप फेटाळताना दोघांनी एअर इंडियानेच विमान उड्डाणाची वेळ बदलल्याचा दावा केला. आपल्यासाठी आधी बसलेल्या काही प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याची आपल्याला अजिबात माहिती नाही. असे झाले असेल तर ते चुकीचे आहे कदापि मान्य होणारे नाही असे रिज्जू यांनी सांगितले. देशभरात व्हीआयपी संस्कृतीबद्दल संतापाची भावना असताना, पुन्हा एका भाजपा मंत्र्याचे व्हीआयपी कल्चरचे उदहारण समोर आले आहे.