नवी मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजन अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच पटसंख्येतही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते. त्यामुळे नवी मुंबईत कोणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आपण सर्वांनीच जागरुक रहायचे असून महानगरपालिका राबवित असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित शाळाबाह्य बालक सर्वेक्षण मोहिम जनजागृतीपर रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासमवेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त अम्बरिश पटनिगीरे, प्र. शिक्षणाधिकारी दत्तात्रय नागरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शाळाबाह्य बालकांचे १ दिवसीय सर्वेक्षण ०४ जुलै रोजी संपूर्ण राज्यात करण्यात येत असल्याची माहिती देत आपले नवी मुंबई शहर शाळाबाह्य विद्यार्थी विरहित करण्याचा संकल्प व्यक्त केला व तो पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटक मनापासून सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला. याच अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय सुविधेचेही सर्वेक्षण व्हावे असे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाचे उपायुक्त अम्बरिश पटनिगीरे यांनी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका मांडत त्यादृष्टीने ४ जुलै रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वाजपर्यंत महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जाऊन शाळाबाह्य बालकांच्या नोंदी केल्या जाणार असल्याची माहिती दिली. याकरीता २७ जून रोजी विष्णूदास भावे नाट्यगृहात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यानुसार या कामाकरीता २२७५ प्रगणक गट स्थापन करण्यात आले आहेत. ०४ जुलै रोजी ४४५० शिक्षक महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करणार असून त्यावर १०४ पर्यवेक्षक, ११ क्षेत्रिय अधिकारी व ५ विशेष भरारी पथके यांच्यामार्फत नियंत्रण ठेवले जाणार आहे.
शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांनी प्रत्येक बालकाने शिकावे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याबाबतच्या समाजजागृती कार्यात प्रत्येक घटकाने आपले योगदान देण्याविषयी सामुहिक शपथ घेतली. शिक्षण विभागाच्या शिक्षक व कर्मचारीवृंदाने सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.
शिक्षण हक्क प्रत्येकाचा शिक्षण मार्ग विकासाचा, प्रत्येकाला शिक्षण भविष्य सक्षम, आपली मुले जर शिकली छान नवी मुंबईचा वाढेल मान, आता आपण होऊ दक्ष प्रत्येक बालकाने शिक्षण घ्यावे हेच आपले लक्ष अशा विविध घोषवाक्यांचे जनजागृतीपर फलक उंचावत, घोषणा देत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साही सहभाग घेतला. वाशीप्रमाणेच शहरातील इतर विभागांतही ठिकठिकाणी या मोहिमेविषयी माहिती प्रसारित करणार्या जनजागृतीपर रॅली काढण्यात आल्या.
या सर्वेक्षणात एकही शाळाबाह्य मूल नोंदविण्यापासून वंचित राहू नये याकरीता सर्व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.