नवी मुंबई : आयएएस/आयपीएस सारख्या उच्च दर्जाच्या करिअरचे प्रकल्पग्रस्त पाल्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सिडकोतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या सहकार्याने २१ जून २०१५ रोजी बार्टी, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेत धाकटा खांदा येथे राहणारी कु.पूजा बाळकृष्ण म्हात्रे व कोपरखैरणे येथे राहणारी कु. कीर्ती बामा पाटील या दोघींनी यश संपादन केले आहे. त्यांचा गुरूवारी सिडको भवन येथे सिडको उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी या विद्यार्थीनींचे कुटुंबियदेखील उपस्थित होते. भाटीया यांनी दोघींचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातदेखील अशीच कठोर मेहनत करून यश संपादन करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लवकरात लवकर परिक्षा उत्तीर्ण होऊन सिडको महामंडळाच्या सेवेत रूजु व्हावे असे देखील भाटीया यांनी दोन्ही विद्यार्थीनींना आवाहन केले.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या दोघींना प्रथम नागपूर येथे शुक्रवार, दि. ३ जुलै २०१५ पासून १५ दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर प्रवेश परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीतील नामवंत संस्थेमध्ये पाठविण्यात येईल. या दोघींचा नागपूर येथे जाण्या – येण्याचा प्रवास खर्च, प्रशिक्षण खर्च तसेच दिल्ली येथे जाण्या-येण्याचा प्रवास खर्च, प्रशिक्षण संस्थेचे शुल्क व दरमहा विद्यावेतन हा सर्व खर्च सिडकोमार्फत करण्यात येणार आहे.